सांगली : जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता शिवसेना, अजितराव घोरपडे गट, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष यांच्या टेकूवर टिकून आहे. मित्रपक्षांना सव्वा वर्षानंतर सभापतिपदाची संधी देण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्यामुळे मित्रपक्षांचे नेते भाजपवर नाराज आहेत. विशेषत: रयत विकास आघाडीतील महाडिक गट आणि सी. बी. पाटील गट नाराज असल्यामुळे भाजपच्या जिल्हा परिषदेतील सत्तेला सुरुंग लावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगली जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षासाठी भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने कमळ फुलविले. पण, आता महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाराष्टÑ विकास आघाडी निर्माण झाली आहे. या आघाडीमुळे राज्यातील राजकारणावर परिणाम होणार आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेमधून भाजपला दूर व्हावे लागणार आहे.जिल्हा परिषदेत ६५ वर्षात प्रथमच भाजपचे कमळ फुलले होते. मात्र अडीच वर्षात भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत फसविल्याचा आरोप मित्रपक्षांचे नेते करीत आहेत. त्याचा फटका भाजपला बसेल, असे चित्र आहे. जिल्हा परिषदेत ६० पैकी तीन जागा रिक्त झाल्या आहेत.
सध्या भाजप २३, काँग्रेस ९, राष्ट्रवादी १३, शिवसेना ३, रयत विकास आघाडी ४, स्वाभिमानी पक्ष १, विकास आघाडी (घोरपडे गट) २, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसचे शिराळा तालुक्यातील कोकरुड जिल्हा परिषद गटाचे सदस्य सत्यजित देशमुख यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सावळज (ता. तासगाव) जिल्हा परिषद गटाचे चंद्रकांत पाटील यांचे निधन झाले आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निकालाचाही सत्तेवर परिणाम होणार आहे.
काँग्रेसच्या पणुंब्रे वारुणच्या सदस्या शारदा हणमंत पाटील यांचीही, भाजप की काँग्रेस, अशी द्विधा मनस्थिती आहे. उमदी (ता. जत) गटाचे सदस्य विक्रम सावंत आमदार झाल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. परंतु, या जागेवर निवडणूक जाहीर झाली नसल्यामुळे ती रिक्तच राहणार आहे. पदाधिकारी बदलावेळी ५९ सदस्यच मतदान करणार आहेत. त्यावेळी काँग्रेसकडे खात्रीशीर सात सदस्य असतील.
राष्ट्रवादीकडे सध्या १३ सदस्यसंख्या आहे. सावळज पोटनिवडणुकीतील निकालानंतर त्यांची संख्या १३ की १४ हे ठरणार आहे. सत्तेसाठी ३० सदस्यांची गरज आहे. भाजपकडे सध्या स्वत:चे २३, मित्रपक्ष रयत विकास आघाडीचे चार, शिवसेना तीन, स्वाभिमानी विकास आघाडी दोन, स्वाभिमानी पक्ष व अपक्ष प्रत्येकी एक, अशी ३४ सदस्यसंख्या आहे. सव्वावर्षात बदल करून सत्तेचा वाटा दिला नसल्याने रयत विकास आघाडीतील महाडिक गटव सी. बी. पाटील गट नाराज आहे. तीच परिस्थिती माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाच्या स्वाभिमानी विकास आघाडीची आहे. त्यांचेही दोन सदस्य आहेत. स्वाभिमानी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आधीच भाजपशी काडीमोड घेतला आहे. त्यांचाही एक सदस्य आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेली आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेतही शिवसेना नेत्यांना आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाचे तीन सदस्य आहेत. भाजपकडील ३४ सदस्यांपैकी मित्रपक्षांच्या दहा सदस्यांची संख्या घटणार आहे. मात्र अपक्ष ब्रह्मदेव पडळकर, प्रमोद शेंडगे यांच्यामुळे २५ सदस्यसंख्या राहील. सत्यजित देशमुख भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या गटाचे दोन सदस्य भाजपमध्ये असे ठरविले, तर २७ सदस्य होतील. रयत विकास आघाडीतील नायकवडी गट विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे या रयत आघाडीच्या सर्वच सदस्यांना घेतल्याशिवाय भाजपचे गणित जुळणार नाही. सत्तेची दोरी आता रयत विकास आघाडीतील नेते सी. बी. पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांच्या हातामध्ये आहे.