उकाड्याने केले हैराण
सांगली : सध्या तापमानाचा पारा वाढू लागला आहे. उन्हाच्या कडाक्याबरोबरच घामाच्या धारांनी नागरिकांना असह्य केले आहे. घशाला कोरड कायम पडलेली आहे. सध्या कोरोनामुळे शीतपेये पितानाही नागरिकांना भीती वाटत आहे.
फिरत्या विक्रेत्यांचे नुकसान
सांगली : सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, फळ, तसेच रसविक्रेते यांनाही आता रस्त्यावर विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच ठप्प झाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कार्यालयांमध्ये भीतीचे वातावरण
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे आता विविध कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. शासनाने १५ टक्के उपस्थितीचा आदेश काढला असला, तरी काही कार्यालयांमध्ये अजूनही १०० टक्के कर्मचारी येत आहेत. त्यामुळे संसर्गाची भीती कायम आहे.
विजेचा खेळ कायम
सांगली : उकाड्याने त्रस्त होत असतानाच रात्री-अपरात्री विजेचा पुरवठा अनियमित झाला आहे. उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागले असतानाच रात्री बऱ्याचदा वीज जात असल्याने पंख्याशिवाय काही काळ राहावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
उद्यानांमध्ये शुकशुकाट
सांगली : सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणांवरही बंदी आणली आहे. त्यामुळे आता उद्याने बंद आहेत. बालके सध्या घरात बसून कंटाळली असली, तरी त्यांना उद्यानात जाता येत नाही. मुलांअभावी या उद्यानात सध्या शुकशुकाट पसरला आहे.
पाण्याची टंचाई
जत : तालुक्यातील अनेक दुर्गम भागांतील जनतेला सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. मिरज पूर्व भागांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.