सांगली : मान्सूनच्या आगमनाने आनंदलेल्या सांगलीकरांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. सांगलीकरांची तृष्णा भागविणारी कृष्णा नदी कोरडी पडली आहे. नदीपात्रातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. महापालिकेने पाणी उपसा करणाऱ्या दोन पंपांपैकी एक पंप बंद केला असून शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या दोन दिवसात कोयनेतील पाणी सांगलीत दाखल झाले नाही, तर पाणी टंचाई आणखी तीव्र होणार आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यातच सांगलीतील कृष्णा नदी अनेकदा कोरडी पडली होती. नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने सांगली व कुपवाड या दोन शहरांवर पाणी संकट दिवसेंदिवस गडद झाले होते. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून, कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहरांवरील पाणी टंचाईचे संकट तूर्तास टळले होते. आता पुन्हा शहरावर पाणी टंचाईचे सावट आहे. दीड महिन्यानंतर पुन्हा कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदीपात्रातील पाणीसाठा बऱ्याचअंशी कमी झाला आहे. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. महापालिकेने आठवडाभरापूर्वी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. अजूनही पाणी नदीपात्रात आलेले नाही. आणखी दोन दिवसांनी सांगली बंधाऱ्यात पाणी येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस पाण्याची कमतरता भासणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. मंगळवारी दिवसभर शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेने उपनगरांत दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. नदीपात्रात तराफ्यावर मोटारी टाकून पाणी उपसा सुरू आहे. बुधवारी शहरात पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी दोन ते तीन दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी) उपसा कमी : एक पंप बंद महापालिकेकडून दोन पंपांद्वारे दर तासाला ३० लाख लिटर पाणी उपसा केला जातो. नदीपात्रात पाणी नसल्याने पालिकेने एक पंप बंद केला आहे. सध्या २० लाख लिटर पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्याच्या उपशावर निम्म्या शहराचीच तहान भागणार आहे. नागरिकांना कूपनलिकांचा आधार... काही नागरिकांनी अपुरा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर कूपनलिकांचा आधार घेतला आहे. शहराच्या शंभर फुटी रस्त्यावरील सर्व उपनगरांमध्ये मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. सांगलीच्या वसंतदादा कारखाना, यशवंतनगर, चिंतामणीनगर परिसरातही पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
सांगलीमध्ये पुन्हा पाण्यासाठी धावाधाव
By admin | Published: June 28, 2016 11:32 PM