शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेची अवस्था ही सध्या ‘दे धक्का’ बनली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
डोंगरकपारीत वसलेली १३ गावे व वाड्या-वस्त्या या आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येतात. रुग्णांसाठी जीवनदायिनी असलेली या आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका सध्या मात्र नादुरुस्त अवस्थेत आहे. या रुग्णवाहिकेचे टायर पूर्णत: गुळगुळीत झाले असून, रोज नित्यनेमाने पाच-दहा जणांनी ढकलल्याशिवाय गाडीने स्टार्टर लागणे अवघड झाले आहे.
अशा या ढकलस्टार्ट रुग्णवाहिकेतूनच गरोदर रुग्णांची इतर ठिकाणच्या रुग्णालयात ने-आण केली जाते तसेच शस्त्रक्रिया होणाऱ्या व झालेल्या रुग्णांची ने-आण केली जाते. ‘अत्यावश्यक सेवा’ असणाºया ठिकाणी देखील प्रशासनाकडून चालकढकल केली जात आहे. याशिवाय आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या आरोग्याच्या विविध मोहिमा पार पाडण्यासाठी व औषधांची ने-आण करण्यासाठी ही रुग्णवाहिका वापरली जाते. दुर्गम भागात आरोग्य सुविधांची वानवा असून उपलब्ध असणाºया सोयी ठिकवण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने रुग्णवाहिकेची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
नादुरुस्त असलेल्या रुग्णवाहिकेची देखभाल दुरुस्ती व्हावी, यासाठी संबंधित विभागास वेळोवेळी कळवूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुरुस्तीसाठी तालुका वैद्यकीय अधिकाºयांना पुन्हा एकदा लेखी निवेदन दिले आहे.- तातोबा पाटील, सामाजिक कार्यकर्तेसध्या परिसरामध्ये गोवर-रुबेला लसीकरणाचे काम सुरू आहे. लसीकरणादरम्यान तातडीच्या वेळेस रुग्णवाहिकेची गरज असते. लसीकरणाचे काम संपले की, लगेच रुग्णवाहिका असलेल्या गाडीचे संपूर्ण काम करून घेण्यात येणार आहे.- डॉ. निरंकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी
शित्तूर वारुण येथील रुग्णवाहिकेला नादुरुस्त झाली असून ती दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.