दिलीप मोहिते - विटा -खानापूर विधानसभा मतदारसंघाची व्होट बॅँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटा शहरातील नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मधील एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी गटाने उमेदवाराची चाचपणी सुरू केली असली, तरी विरोधकांनी मात्र नगरसेवक अपात्रतेच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देत नगरसेवकपद अपात्रता व पोटनिवडणूक प्रकियेला स्थगिती घेण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. परंतु, पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, उद्या गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे विरोधकांना स्थगिती आदेश मिळविण्यात कितपत यश येणार, याकडे विटेकरांचे लक्ष लागले आहे.विटा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ६ मधील नगरसेविका सौ. रूपाली मेटकरी या पालिकेच्या कौन्सिल सभेस विनापरवानगी व रजेचा अर्ज न देताच गैरहजर राहिल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी सत्ताधारी गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्या तक्रारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेविका सौ. मेटकरी यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. त्यामुळे या प्रभाग क्र. ६ मधील एका जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी गटाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असतानाच विरोधकांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देत पोटनिवडणूक प्रक्रियेला नगरविकास मंत्रालयाकडून स्थगिती मिळविण्यासाठी धावपळ सुरू केल्याची चर्चा आहे. परंतु, पालिका पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्या गुरुवारपासून सुरू होत असल्याने विरोधकांना स्थगिती मिळविण्यात कितपत यश येणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते. परंतु, त्याबाबत पालिका प्रशासनाला कोणतीही नोटीस अथवा पत्र आले नसल्याचे मुख्याधिकारी रोकडे यावेळी बोलताना म्हणाले.असा आहे पोटनिवडणूक कार्यक्रमविटा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ६ मध्ये नामाप्र महिला उमेदवारासाठी आरक्षण असल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या प्रभागात गांधीनगर, भवानीनगर (हारेवाडी), मायाक्कानगर, आंबेडकरनगर तसेच गावभागातील शितोळे गल्लीतील पूर्व बाजू या भागाचा समावेश असून, या प्रभागात नवीन अंतिम मतदार यादीनुसार २ हजार ९८ पुरुष, तर १ हजार ९४१ स्त्री असे एकूण ४ हजार ३९ मतदार आहेत. उद्या गुरुवारपासून दि. २३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार असून, दि. २४ रोजी छाननी, ५ जानेवारीला अर्ज माघार घेणे, दि. १८ जानेवारीला मतदान व दि. १९ जानेवारीला मत मोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे.
विट्यात पोटनिवडणूक स्थगितीसाठी धावपळ
By admin | Published: December 16, 2014 10:34 PM