सांगली : राज्यात पुन्हा लॉकडाऊनची तयारी सुरू झाल्याने परप्रांतीय कामगार धास्तावलेल्या स्थितीत आहेत. बेरोजगारीच्या स्थितीत अडकून पडण्याची भीती असल्याने स्थलांतराला सुरुवात झाली आहे. याचा धसका उद्योजकांनीही घेतला आहे. कामगारांअभावी उद्योगांची चक्रे ठप्प होण्याची भीती त्यांच्यापुढे आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दररोजची संख्या आता पाचशेपार गेली आहे. संपूर्ण राज्यातील स्थिती गंभीर असल्याने लॉकडाऊन सुरू होणार हे निश्चित आहे; पण ते केव्हा आणि किती काळ? हे अद्याप निश्चित नाही. या अनिश्चिततेमुळे परप्रांतीय कामगार वर्ग प्रचंड भीतीमध्ये आहे. सांगली, मिरज, कुपवाड अैाद्योगिक वसाहतींत हजारोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. विशेषत: छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा येथून स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. लॉकडाऊनला तोंड देण्याची त्यांची तयारी आहेे; पण ते किती लांबणार, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळेच कोणताही धोका पत्करण्याची त्यांची तयारी नाही. गेल्या लॉकडाऊनमध्ये झालेले हाल ते विसरलेले नाहीत. त्यावेळी आपापल्या गावाकडे निघून गेलेले अनेक कामगार पुन्हा परतलेदेखील नाहीत.
लाॅकडाऊनचे ढग फिरू लागताच कामगारांचे स्थलांतरही सुरू झाले आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी मिरज जंक्शनमध्ये गर्दी दिसत आहे. खासगी लक्झरीसाठी कुटुंबकबिल्यासह गर्दी करणारे कामगार दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीत फाउन्ड्री उद्योगातून स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. त्याशिवाय रंग, रसायने, कापड, खाद्य प्रक्रिया, कृषिप्रक्रिया, फेब्रिकेशन आदी उद्योगांतूनही कामगार बाहेर पडत आहेत.
चौकट
लॉकडाऊनमधील हाल अद्याप स्मरणात
गेल्या लॉकडाऊनमध्ये वेळीच घराकडे न गेलेल्या कामगारांना उपासमारीला तोंड द्यावे लागले होते. उद्योजकांनी काही काळ मदत केली; पण लॉकडाऊन लांबल्याने कारखाने बंद पडले, त्यामुळे उद्योजकांनीही हात आखडता घेतला. परिणामी अनेक कामगारांना महापालिकेच्या निवारागृहात आश्रय घेण्याची वेळ आली होती.
कोट
गेल्यावर्षी दिवाळीपर्यंत गावाकडेच राहिलो होतो. कारखाना सुरू होताच परत आलो. आता पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने पत्नी व मुलांना गावाकडे पाठवून दिले. मी एकटाच थांबलो आहे. लॉकडाऊन झाले तरी एकट्याचे हाल होणार नाहीत, असे वाटते. कंपनीकडून मिळणाऱ्या मदतीवर दिवस काढता येतील.
- रमेशकुमार वालिया, फाउन्ड्री कामगार
कुपवाडमध्ये फाउन्ड्रीत ३० जण एकत्र काम करतो. लॉकडाऊनमध्ये काम बंद होण्याच्या भीतीने १० जण गेल्या आठवड्यात निघून गेले. कंपनी व्यवस्थापनाने लॉकडाऊनमध्येही मदतीची हमी दिल्याने आम्ही थांबलो आहोत. लॉकडाऊन किती लांबेल याचा अंदाज नाही, त्यामुळे धाकधूक आहे. गावाकडे गेलो तरी आता काम नाही, त्यामुळे येथेच थांबणार आहे.
- नीरज देहडा, फाउन्ड्री कामगार
- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या पाहून घरच्या लोकांचे फोन येत आहेत. काम सोडून परत येण्यासाठी दबाव येतोय. तरीही आम्ही १५-२० कामगार थांबून आहोत. लॉकडाऊन लांबले तर काम मिळण्याचा भरोसा नाही, त्यामुळे एक-दोन दिवसांत आम्ही गावी जायच्या तयारीत आहोत.
- सर्वेश चौधरी, फेब्रिकेशन कामगार
चौकट
कामगार परतले तर न भरून येणारे नुकसान
लॉकडाऊनच्या बातम्या ऐकून परप्रांतीय कामगार आताच परतीच्या मार्गावर आहेत. हीच स्थिती राहिली तर उत्पादन ५० टक्क्यांवर घसरेल. गेल्या चार-पाच महिन्यांत उद्योगचक्रे गती घेत होती, ती पुन्हा विस्कळीत होतील. गेल्यावेळी गावाकडे गेलेले अनेक कामगार अजूनही आलेले नाहीत, उरलेसुरले गेले तर कारखान्यांना कुलपे लावण्याची वेळ येईल.
- विनोद पाटील, उद्योजक
संभाव्य लॉकडाऊनमध्ये उद्योगांचा समावेश करण्याचे सरकारचे संकेत नाहीत, त्यामुळे कामगार अद्याप थांबून आहेत. गेल्यावर्षी गेलेले कामगार शंभर टक्के परतलेले नाहीत; पण उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे उद्योग सुरू आहेत. यंदाचा लॉकडाऊन लांबला आणि त्यामध्ये उद्योगांचाही समावेश केला तर मात्र स्थिती बिकट होईल.
- सतीश मालू, उद्योजक
कामगार निघून जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या लसीकरणासाठी औद्योगिक वसाहतीतच सोय करण्याचा प्रयत्न आहे. सध्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वे सुरू आहेत. त्यामुळे कामगारांचा कल गावाकडे निघून जाण्याचा आहे. तसे झाल्यास उद्योग कोलमडल्याशिवाय राहणार नाहीत.
- गणेश निकम, व्यवस्थापक, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
पॉइंटर्स
कामगार कुठे किती?
औद्योगिक वसाहतीतील कामगार - ३०,०००
हॉटेल व्यवसाय - १५ हजार
बांधकाम क्षेत्र- ३५ हजार