Russia Ukraine War: भुकेने व्याकुळ, दोन दिवस सात अंश तापमानात भयावह प्रवास, विद्यार्थ्यांचे भयान अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 05:32 PM2022-03-05T17:32:50+5:302022-03-05T17:33:17+5:30
कसबे डिग्रजमधील प्रथमेश सुनील हंकारे आणि तुंगचा अभिषेक प्रकाश पाटील याने सांगितले अनुभव
सांगली : ‘चाळीस किलोमीटर टॅक्सीच्या प्रवासासाठी सहा हजार रुपये मोजले. नंतर दोन दिवस-दोन रात्री कडाक्याच्या थंडीत चालत पोलंडमध्ये पोहोचलो. सात अंश तापमान होते. भुकेने व्याकुळ झालो होतो. पण सुरक्षित पोहोचल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला...’, प्रथमेश हंकारे आणि अभिषेक पाटील सांगत होते. दोघेही गुरुवारी रात्री युक्रेनमधून गावाकडे पोहोचले. शुक्रवारी सकाळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. सगळे विद्यार्थी मायदेशी परतू लागले. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजमधील प्रथमेश सुनील हंकारे आणि तुंगचा अभिषेक प्रकाश पाटील यांचाही त्यात समावेश होता. युक्रेनमधील लिव्हिव नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये हे दोघे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. ते गुरुवारी रात्री उशिरा गावाकडे परतले आणि कुटुंबातील मंडळींना हायसे वाटले.
प्रथमेश म्हणाला, ‘लिव्हिवजवळचे विमानतळ बॉम्बच्या वर्षावाने उडविण्यात आले होते. सगळीकडे भीतीचे वातावरण होते. क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू होते. रस्त्यांवर रणगाडे दिसत होते. त्यामुळे आम्ही सगळे भारतीय विद्यार्थी तेथून निघालो. आम्ही पोलंडच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लिव्हिवपासून सुमारे ७० किलोमीटरवर पोलंड आहे. चाळीस किलोमीटर टॅक्सीच्या प्रवासासाठी सहा हजार रुपये मोजले. नंतर दोन दिवस-दोन रात्री कडाक्याच्या थंडीत चालत पोलंडमध्ये पोहोचलो. सात अंश तापमान होते. भुकेने व्याकुळ झालो होतो.’
अभिषेक म्हणाला, ‘सुमारे दीडशे भारतीय विद्यार्थी आमच्यासोबत होते. त्यानंतर भारतीय दूतावासाने मोठ्या प्रमाणात मदत केली. जेवण-खाणे, प्रवास आणि इतर अनेक प्रकारची मदत मिळाली. हवाईदल, इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानसेवेने मायदेशात परत आलो.’
गुरुवारी रात्री उशिरा दोघे गावात परतले. आता या विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण कसे होणार याबाबत चिंता आहे.