Russia vs Ukraine War: सरकारनं आम्हाला लवकर मायदेशी न्यावं; युक्रेनमध्ये अडकलेल्या शिवांजली अन् ऐश्वर्याची आर्त साद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 09:26 PM2022-02-26T21:26:16+5:302022-02-26T21:29:50+5:30
Russia vs Ukraine War: रशियाच्या सीमेपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या खारकिव्हमध्ये सांगलीच्या दोघी; मदतीसाठी आर्त साद
- प्रताप महाडिक
कडेगाव: भारतय सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला मदत करावी. युक्रेनमधून आम्हाला बाहेर काढावं. किमान परिस्थिती कशी हाताळावी याबाबत दूतावासाने मार्गदर्शन करावे. रशियाच्या सीमेपासून अवघ्या ३५ ते ४० किमी अंतरावर असलेल्या खारकीव्हमध्ये आमचे मेडिकल कॉलेज आहे. तेथेच हॉस्टेलच्या खाली असलेल्या बंकरमध्ये (तळघरात ) आम्हाला ठेवले आहे. स्फोटांचे कानठळ्या बसणारे आवाज अंगावर काटा आणत आहेत. त्याच तणावात आम्ही आहोत. युद्धामुळे महागाई वाढली आहे. एटीएमवर पैसे निघत नाहीत.बँकेमध्ये रोकड नाही. मेसमध्ये जे बनते तेच कसेबसे खायला मिळते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे.असे युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेपुरच्या शिवांजली दत्तात्रय यादव व ऐश्वर्या सुनील पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने युक्रेनमध्ये अडकलेल्या तेथे शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे.यात महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत.यात कडेगाव तालुक्यातील कडेपुर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील या दोघी आहेत.मेडिकल शिक्षणासाठी दोघी खारकीव्हमध्ये आहेत.हे ठिकाण रशियाच्या सीमेपासून ३५ ते ४० किमी अंतरावर आहे.रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने सध्या तणावग्रस्त स्थिती आहे.याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या होस्टेलच्या खाली असलेल्या बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे.याच ठिकाणी शिवांजली यादव आणि ऐश्वर्या पाटील आहेत.असे या विद्यार्थ्यांनिनी सांगितले.
शिवांजली व ऐश्वर्या यांनी सांगितले, की युद्ध सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांना बंकरमध्ये सुरक्षित ठेवले आहे. युक्रेनच्या ईशान्येला खारकिव्ह आहे. तेथून जवळच रशियाची सीमा आहे. आम्हाला स्फोटांचे मोठे आवाज ऐकायला येताहेत. रात्री १-२ वाजेपर्यंत हे आवाज येतात. त्यानंतर हळूहळू बंद झाले. सकाळी साडे दहाच्या सुमारास पुन्हा स्फोटांचे आवाज सुरू झाले. बाहेर जाता येत नाही. या काळात कॉलेजकडून सहकार्य मिळत नाही. युद्धामुळे महागाईही प्रचंड वाढली आहे. खाद्य पदार्थ खूप महाग झाले आहेत.महाग असले तरी ते मिळणेही कठीण झाले आहे. एटीएम चालत नाही बँकेत रोकड नाही.त्यामुळे चणचण आहे.पाणी व खाण्याची टंचाई आहे.युद्ध जन्य स्थितीमुळे आम्हाला एकत्र बाहेर जाता येत नाही.काही हवे असेल तर एक एकटयाला बाहेर जावे लागते.येथून सुटका होण्यासाठी लवकर प्रयत्न व्हावेत.अशी अपेक्षा आहे.
आम्ही कसं परतणार?
आम्ही कसं परत येणार?"युक्रेनमधून भारतात सुखरुप कसं परतायचं? हा प्रश्न या आमच्यासमोर आहे. २४ फेब्रुवारीपासून फ्लाईट्स बंद झाल्या त्यामुळे आम्ही अडकलोय,इथून रशियाची सीमा जवळच आहे .भारत सरकारने खारकिव्हमधील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना रशियामार्गे भारतात आणण्याच्या पर्यायावर तातडीने निर्णय घ्यावा किंवा सोयीनुसार योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला सुरक्षित भारतात आणावे असे आवाहन शिवांजली यादव हिने केले .
माझ्या मुलीसह सर्व भारतीय विद्यार्थांना युक्रेनमधून सुखरूप भारतात आणा; दत्तात्रय यादव यांची कळकळीची विनंती
युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना सुखरूप भारतात आणावे अशी कळकळीची विनंती आहे .माझी मुलगी शिवांजलीसह इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रशासनाने भारतात सुखरूप आणावे. असे शिवांजली यादव हिचे वडील दत्तात्रय यादव यांनी सांगितले.