सांगली : संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एस. टी. महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरही महामंडळाच्या ४०० निवृत्त कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी आगारात चकरा माराव्या लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एस. टी. च्या सांगली विभागातील ४०० कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन वर्षांपासून २० कोटी रुपये एस. टी. महामंडळाकडे थकीत आहेत. या पैशांची मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही, असा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.
एस. टी. महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना केवळ महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळते. दरम्यान, सेवानिवृत्तीनंतर अनेक आजारांशी या कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत आहे. औषधोपचारांसाठीही पैसे मिळत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे. या कठीण परिस्थितीतही त्यांना त्यांच्या हक्काचे निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे महामंडळाकडून मिळालेले नाहीत. २०१८ पर्यंत निवृत्तीनंतर आठ दिवसांत पैसे मिळत होते. २०१९ पासून सांगली जिल्ह्यातील तब्बल ४०० निवृत्त झालेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे २० कोटी रुपये देणे थकीत आहे. अनेक कर्मचारी आपल्या हक्कांचे पैसे मिळविण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षांपासून चकरा मारत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे एस. टी. कामगार संघटनेनेही एस. टी. महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहकांसह यांत्रिक कर्मचारी, एस. टी. कडील सेवानिवृत्त अधिकारी यांचे रजेचे पैसे महामंडळाकडे दोन वर्षांपासून थकीत आहेत.
चौकट
व्याजासह थकीत पैसे द्या
सरसकट सर्व कामगारांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह देण्याची मागणी एस. टी. महामंडळाकडील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबतची मागणी एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जर पाठपुरावा करूनही निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी मिळाली नाहीत तर आम्ही १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त एस. टी. महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत, असा इशारा निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.