सांगली : आरामदायक व खात्रीशीर प्रवासाची हमी देणाऱ्या एस. टी.तही विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांचा भरणा वाढत चालला आहे. वाहकांची नजर चुकवून प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने पाच विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सोमवार, दि. १५ ते २५ फेब्रुवारी दरम्यान यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामुळे एस. टी.तून फुकट प्रवास करणाऱ्यांना लगाम बसणार आहे.
कोरोना आटोक्यात आल्याने एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीत वाढ झाली असून, काही फुकटे प्रवासी याचा गैरफायदा घेत आहेत. अशा प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाच्या प्रशासनाने घेतला आहे. एस. टी.ची सांगलीमध्ये जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, विटा, इस्लामपूर, पलूस, शिराळा, सांगली अशी दहा आगार आहेत. या दहा आगारांमध्ये तिकीट तपासण्यासाठी पाच स्वतंत्र पथके नेमली आहेत. एस. टी.चे विशेष पथक दिनांक १० ते २५ फेब्रुवारीदरम्यान कोणत्याही बसस्थानकात किंवा एस. टी.च्या मार्गावरच प्रवाशांचे तिकीट तपासेल. एस. टी.ने लॉकडाऊननंतर अष्टविनायक यात्राही सुरु केल्या असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विशेष तपासणी मोहिमेमुळे फुकट्या प्रवाशांना चाप तर बसेलच, परंतु एस. टी.च्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
चौकट
अशी होणार वसुली
एस. टी.चे तपासणी पथक २४ तास काम करणार असून, ही विशेष मोहीम संपल्यानंतरही प्रवाशांचे तिकीट प्राधान्याने तपासले जाणार आहे. त्यासाठी नेमलेली पाच पथके कायमस्वरुपी कार्यरत राहतील. १०० रुपयांच्या आत तिकीट असल्यास १०० रुपये दंड व तिकिटाची रक्कम असे पैसे आकारण्यात येतील, तर १०० रुपयांच्या वर तिकीट असल्यास दुप्पट रकमेची आकारणी करण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.
चौकट
प्रवासी संख्येत घट
सातत्याने घटणाऱ्या प्रवासी संख्येमुळे एस. टी.च्या उत्पन्नात घट होत आहे. यावर तोडगा काढून प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. खासगी प्रवासी वाहतुकीशी एस. टी.ला स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे एस. टी.चे हक्काचे प्रवासीही कमी होत चालले आहेत. बसस्थानकाच्या आवारातच खासगी वाहने उभी करुन प्रवासी पळविण्याचे प्रकारही सुरू आहेत.