घनश्याम नवाथेसांगली : आटपाडी म्हणजे दुष्काळी तालुका. याच दुष्काळी तालुक्यातील दोघा खेळाडूंनी थेट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धडक मारली आहे. पॅरिस येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील १२ खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील करगणीचा गोळाफेक खेळाडू सचिन खिलारी आणि कौठुळीचा बॅडमिंटनपटू सुकांत कदम या दोघांचा समावेश आहे. दोघेही पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासातील ही अभिमानास्पद घटना म्हणावी लागेल.करगणीचा सचिन खिलारी हा शाळेत असताना सायकलवरून पडून जखमी झाला. दुखापतीतून त्याला अपंगत्व आले. पुण्यात तो अभियंता बनण्यासाठी आला. खेळाची आवड होती. भालाफेकमध्ये त्याने विद्यापीठ स्तरावर पदके पटकावण्यास सुरुवात केली. पॅरा नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला भालाफेक थांबवावी लागली. मग त्याने गोळाफेककडे लक्ष केंद्रित केले. गोळाफेकमध्ये तो देशातच नव्हे, तर जगात अव्वल ठरला. जपान येथे मे २०२४ मध्ये झालेल्या जागतिक पॅरा ऑलिम्पिकमध्ये १६.३० मीटर गोळाफेक करत सुवर्णपदक पटकावले. त्याने २०२३ च्या पॅरिसमधील स्पर्धेतील स्वत:चाच १६.२१ मीटर गोळाफेकीचा विक्रम मोडला. आता पॅरिस येथे ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली आहे.आटपाडी तालुक्यातील कौठुडी सुकांत कदम हा जागतिक पॅरा बॅडमिंटन क्रमवारीत सध्या पाचव्या स्थानावर आहे, तर पुरुष दुहेरीत प्रमोद भगत आणि त्याची जोडी जगात अव्वल मानांकित आहे. २०१८ मध्ये आशियाई स्पर्धेत त्याने कास्य पदक पटकावले आहे. जागतिक स्पर्धेत त्याने २०१९, २०२२, २०२४ मध्ये कास्य पदक पटकावले आहे. आयडब्ल्यूएएस जागतिक स्पर्धेत २०२९ मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य, पेरूमधील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. शिवछत्रपती आणि एकलव्य खेल पुरस्काराने तो सन्मानित आहे. सचिनबरोबर त्याचीही पॅरा ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.राज्यातील बारा खेळाडूंमध्ये समावेशऑलिम्पिक व पॅरा ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रातील १२ खेळाडू पात्र ठरलेत. त्यामध्ये दोघे जण सांगली जिल्ह्यातील आणि आटपाडी तालुक्यातील आहेत. दोघांच्या निवडीने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.असाही एक योगायोगसचिन खिलारी आणि सुकांत कदम या दोघांच्या इंग्रजी नावाची अद्याक्षरे ‘एस.के.’ आहेत. दोघेही एकाच तालुक्यातील आहेत. दोघेही इंजिनिअर आहेत. त्यांच्या गावाच्या नावाचे इंग्रजी अद्याक्षर हे ‘के’वरून करगणी आणि कौठुळी असे आहे.
सांगली जिल्ह्यातील दोघांची पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये धडक, असाही एक योगायोग
By घनशाम नवाथे | Published: July 16, 2024 3:27 PM