प्रताप महाडिक ।कडेगाव : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून ज्यांच्या नावाला पसंती मिळत आहे, ते आ. डॉ. विश्वजित कदम निवडणूक लढविण्यास इच्छुक दिसत नाहीत. लोकसभेच्या उमेदवारीची संधी सोडण्याचा विचार कदम यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव केलेला त्याग आहे, की राजकीय मुत्सद्दीपणा, या चर्चेला उधाण आले आहे.राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या मर्जीतील काँग्रेसचे युवा नेते म्हणून ओळख असलेल्या विश्वजित कदम यांनी लोकसभेची निवडणूक ताकदीने लढविल्यास ते भाजपसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात. सांगली लोकसभेचा गड पुन्हा ताब्यात घेण्यात त्यांनी यश मिळविले, तर दिल्लीदरबारी त्यांचा मोठा दरारा निर्माण होईल, असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.
दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आ. कदम यांना पलूस-कडेगाव मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवून वडील माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा जपण्याची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. यामुळेच लोकसभेची उमेदवारी नको, असेच संकेत कदम यांच्याकडून मिळत आहेत.
दरम्यान, येथे अन्य कोणालाही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून उमेदवारी मिळाली तरी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे स्टार प्रचारक म्हणून सर्वस्वी जबाबदारी मात्र विश्वजित कदम यांच्यावरच राहणार आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते एकसंध करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने भाजपशी लढा देण्यात आ. कदम यांनाच आघाडीवर रहावे लागणार आहे. यामुळे लोकसभा न लढविण्याचे संकेत देणाऱ्या कदम यांना उमेदवार निवड प्रक्रियेत मात्र महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन राजकीय मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवावी लागणार आहे....तर आघाडी धर्म पाळावा लागेलअहमदनगरची जागा काँग्रेसला दिली, तर त्याबदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आमदार विश्वजित कदम यांना आघाडी धर्माचे पालन करावे लागेल. यामुळे लाड यांनाही विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे कर्तव्य पार पाडावे लागेल. दरम्यान, पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे कितीही बदलली, तरी कदम-देशमुख घराण्यातील राजकीय संघर्ष मात्र सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.