सांगली : सांगलीमध्ये रविवारी झालेल्या महायुती मेळाव्यामध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या भाषणात 'आम्ही बँडवाले नाही आम्हाला सन्मान द्या' असे वक्तव्य केले. याबद्दल बँड मालक व कलाकार कृती समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम जाधव यांनी खोत यांचा सोमवारी निषेध व्यक्त केला.यावेळी ते म्हणाले, सदाभाऊ खोत यांचे हे वक्तव्य निंदनीय असून यामुळे आमच्या बँड कलाकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. बँड व्यवसायाला खूप मोठा इतिहास आहे. याचा विसर कदाचित त्यांना पडला असावा. बँडची परंपरा आज अनेक कलाकार जपत आहेत. कोणत्याही शुभकार्यासाठी बँड कलाकारांना सन्मानाने बोलावले जाते. हे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. महायुतीमध्ये जर त्यांना काही मिळत नसेल व त्यांना बेरजेत धरले जात नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी त्याचे आत्मचिंतन करावे व सर्व बँड कलाकारांची तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या निवासस्थाना समोर बँड बजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शुभम जाधव यांनी दिला.
सदाभाऊ खोत यांचा बँडमालक संघटनेकडून निषेध, कलाकारांचा अवमान केल्याबद्दल संताप
By अविनाश कोळी | Published: January 15, 2024 4:11 PM