अशोक पाटीलइस्लामपूर : राज्यपाल कोट्यातून बारा आमदारांच्या नियुक्त्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये इस्लामपूर, शिराळा मतदारसंघातील सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, दक्षिण कराडमधील अतुल भोसले यांना संधी मिळावी, अशी समर्थकांची अपेक्षा आहे. परंतु महाराष्ट्रातील दिग्गज या स्पर्धेत असल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंडखोर गट आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या शिवसेना - भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू असतानाच रयत शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी राज्यात आपला संपर्क वाढविला. यातूनच शेतकऱ्यांचे पाठबळ या संघटनेला आहे. त्यामुळे राज्यपाल कोट्यातून मिळणाऱ्या आमदार पदावर खोत यांचा पहिल्यापासूनच दावा आहे.शिराळा मतदारसंघात दिवंगत माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसची ताकद अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काँग्रेसमध्ये न्याय कधी मिळणार? असा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी २०१९ झालेल्या निवडणुकीअगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारपदाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यपाल कोट्यातून त्यांना आमदारपद मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.अतुल भोसले यांचा विचार होणार का?दक्षिण कराडमधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उभे ठाकलेले भाजपचे अतुल भोसले यांचा पराभव भाजपला जिव्हारी लागला आहे. याचाच विचार करून भोसले यांना आमदारपद देण्याचे विचाराधीन असल्याचे समजते.