अशोक पाटील -इस्लामपूर --गेल्या काही महिन्यांपासून भाजप कोअर कमिटीकडून घटकपक्षांना मंत्रीपद देण्याचे फक्त आश्वासनच मिळत आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर एकच रामबाण उपाय म्हणून, पुणे येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या जवळ बसून खोत यांनी सत्ताधारी भाजपला चपराक दिली आहे. यामागे मंत्रिपदासाठी भाजपवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे, मात्र सदाभाऊंच्या या भूमिकेवर स्वाभिमानी पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आह. लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना केंद्रात कृषिमंत्री होण्याचे स्वप्न पडले होते, तर माढा लोकसभा मतदार संघात चुरशीने निवडणूक लढविलेल्या सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार, या चर्चेला उधाण आले होते. पण या दोघांच्याही स्वप्नाचा भाजपने चुराडा केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांना मंत्रीपद देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्वाभिमानी संघटनेतील कार्यकर्ते सांगत आहेत. परंतु याला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानीच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे दोन वर्षात शांत राहिलेल्या या संघटनेला आता पुन्हा शेतकऱ्यांचा कळवळा येत आहे. या त्यांच्या कळवळ्याची दखल त्यांच्याच तालुक्यात असलेले आमदार जयंत पाटील यांनी घेतली नाही. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात स्वाभिमानीचा आलेख खालावला आहे.एकंदरीत ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मोठे झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महाआघाडीतील पक्षांबरोबर असताना, पुणे येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजितदादा पवार यांच्या जवळ बसलेल्या सदाभाऊ खोत यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, त्यांनी तात्काळ मुंबई येथे घटकपक्षांची बैठक बोलावल्याचे समजते. यावरूनच स्वाभिमानीने राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन भाजपवर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे. एकीकडे दबावतंत्राचे हे राजकारण रंगले असताना स्वाभिमानी पक्षात या नव्या भूमिकेमुळे अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. शेतकरी चळवळीतून मोठे झालेले सदाभाऊ खोत हे साखरसम्राटांना विकले गेले आहेत. ते बनावट शेतकरी नेते आहेत. सत्ता, संपत्तीच्या लालसेपोटी शेतकऱ्यांचा कसा विश्वासघात करावा, हे त्यांच्याकडून शिकावे. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून भाजपवर दबाव आणण्याची खेळी खोत यांनी केली आहे.बी. जी. पाटील, संस्थापक, बळिराजा शेतकरी संघटना.स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत आणि भाजपचे शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून जयंत पाटील आणि संजय पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादीच्याच वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून सदाभाऊ तसेच घटक पक्षांनी केलेली दबावाची खेळी राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.
सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेने ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ
By admin | Published: March 09, 2016 12:58 AM