विटा : गटा-तटाच्या व जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे कॉँग्रेसचे नुकसान झाले असून, येथे दहा वर्षे कॉँग्रेसचे आमदार असतानाही खानापूर पंचायत समिती कॉँग्रेसच्या ताब्यात कधी आली नाही. माजी आमदार सदाभाऊ पाटील कोणालाही विश्वासात घेत नाहीत. नेत्यांनी कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागते, परंतु ते ही ताकद स्वत:साठी वापरत आहेत, अशी टीका अशोकराव गायकवाड यांनी प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्यावर केली.येथे खानापूर तालुका व विटा शहर कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम होते. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, माजी आ. हाफिज धत्तुरे, सत्यजित देशमुख, रामरावदादा पाटील, शैलजा पाटील, सौ. मालन मोहिते, आनंदराव मोहिते, जि. प. सदस्य सुहास शिंदे, सुरेश मोहिते, पृथ्वीराज पाटील, शशिकांत देठे, प्रतापराव साळुंखे, रवींद्र देशमुख, दत्तोपंत चोथे उपस्थित होते.गायकवाड यांच्या टीकेवर सदाशिवराव पाटील म्हणाले की, कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षपातळीवर एकसंध राहिले पाहिजे. पाठीमागे झालेल्या चुकांचा आता ऊहापोह करू नका. त्यावर आता बोळा फिरवा. आगामी निवडणुकांत कार्यकर्त्यांनी वेगळी ताकद दाखविण्याची भूमिका न घेता पक्ष सांगेल तेच ऐकले पाहिजे. समन्वय व रूजवातीचे राजकारण केल्यास निश्चित यश मिळेल. त्यासाठी पक्ष व नेतृत्व करणाऱ्यांशी सर्वांनी एकत्रित आणि प्रामाणिक रहावे.ते म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती व आमदारकी नसल्यामुळे कार्यकर्त्यांचे काय हाल होतात, हे आता सर्वांना समजले आहे. त्यामुळे यापुढील काळात सर्वांनी कोणाकडे संशयाने पाहू नका. हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवेल तोच आपला पक्षाचा उमेदवार असेल, हे कोणीही विसरू नका. नेत्यांनीही कोणी काही सांगतो म्हणून न ऐकता रूजवातीची भूमिका घ्यावी. त्यामुळे आपापसातील गैरसमज दूर होतील.मोहनराव कदम म्हणाले की, गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यात आपले काम होत नाही. राग, व्देष सोडून तालुक्यात कोणावरही अन्याय होणार नाही, त्याची जबाबदारी प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्षांची आहे. मात्र कार्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची चर्चा करू नका.विटा शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे यांनी स्वागत, खानापूर तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास आप्पासाहेब शिंदे, वसंतराव गायकवाड, जयदीप भोसले, अजित ढोले, नंदकुमार पाटील, अशोक पवार, डॉ. नामदेव कस्तुरे, मनीषा शितोळे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा चोथे, स्वाती भिंगारदेवे, जयकर कदम, उपनगराध्यक्ष अॅड. सचिन जाधव, भानुदास सूर्यवंशी, राजेंद्र माने, इंद्रजित साळुंखे, आनंदराव पाटील, किरण तारळेकर उपस्थित होते. (वार्ताहर)लोकप्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांकडून बेदखलसदाशिवराव पाटील यांनी आ. अनिल बाबर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, येथील लोकांचे (आ. बाबर) सरकारमध्ये फार काही चालते असे वाटत नाही. कारण मुख्यमंत्री आले, मात्र ते लोकप्रतिनिधींना बेदखल करून गेले. टेंभूच्या टप्पा भूमिपूजनला भाजपचे मंत्री आले, त्यांनी लोकप्रतिनिधींना साधे बोलाविलेही नाही. वलखडच्या टेंभू कालव्यावरील दरवाजाचे भूमिपूजन झाले, लोकप्रतिनिधींना निमंत्रणही दिले नाही. टेंभूची सर्व कार्यालये यवतमाळला स्थलांतरित झाली. लोकप्रतिनिधी गप्पच राहिले.
सदाभाऊ विश्वासात घेत नाहीत!
By admin | Published: June 21, 2016 12:19 AM