सांगली : विधानपरिषदेसाठी मी भाजपचाच एबी फॉर्म दाखल केला होता. भाजपचा मी क्रियाशील सभासदही आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे प्रवेश करण्याची मला गरज वाटत नाही, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. रयत क्रांती हा पक्ष नसून शेतकऱ्यांसाठीचे ते व्यासपीठ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश केला असून, भाजपचा क्रियाशील सभासद आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्टÑवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा चष्माच हिरवा असल्याने त्यांना सर्व हिरवेच दिसते आहे. आम्ही आजवर कोणती बॅँक लुटली नाही, एकाच जागेवर दोन-दोन संस्था उभारून अनुदान लाटले नसल्याने आरोपांची फिकीर नाही. मोठं बोल, खोटं बोल अन् तेही रेटून बोल ही धनंजय मुंडे यांची वृत्ती आहे.खोत म्हणाले की, कृषी अनुदानाचा नातेवाईकांनाच लाभ देण्यात आल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. यावर सभागृहातच मी सविस्तर उत्तर दिले. तरीही ते माझ्यावर आरोप करत आहेत. मोठे बोल, खोटे बोल अन् तेही रेटून बोल ही मुंडे यांची वृत्ती आहे. मुंडेंनी अगोदर आपल्या भोवतीचा जाळ बघावा. आम्ही कोणतीही बॅँक लुटली नाही. दारूगोळा भरून आम्हीही तयार आहोत. आम्ही आजवर एका जागेवर दोन-दोन सूतगिरण्या दाखवून कोणतेही अनुदान लाटले नाही. गोरगरीब जनतेच्या नावाने मागासवर्गीय सूतगिरण्या उभारून त्या लुटल्या नाहीत. त्यामुळे ‘सौ चूहे खाके बिल्ली चली हाजको’ ही राष्टÑवादीची प्रवृत्ती आहे.दिलीपतात्या जयंतरावांच्या गटातील सोंगाड्या!इस्लामपूरच्या सभेत मला काहींनी फुटाणा, तर काहींनी दीडआणा म्हटले, पण आम्ही केव्हा तरी प्रवासातच फुटाणे खात असतो. मात्र, जे रात्रीचे फुटाणेच घेतात, त्यांना फुटाणेच आठवणार. फुटाणे खाल्ल्यानंतर त्यांना आपण राजा बनल्याचा भास होतो. जे स्वत:च काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसºयावर आरोप करताना थोडा विचार करावा. फुटाण्याचा आरोप करणारा नेता जयंतरावांच्या गटाचा सोंगाड्या आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी दिलीपतात्या पाटील यांचे नाव न घेता लगावला.माणसे आली की आणली?इस्लामपूर येथे झालेल्या हल्लाबोल यात्रेवर बोलताना खोत म्हणाले की, टीका करून त्यांना प्रसिध्दी मिळत असेल म्हणून ते माझ्यावरच बोलणार. पक्षवाढीसाठी त्यांची धडपड सुरू असून, मेळाव्यासाठी लोक आले होते का आणले होते, याची माहिती अद्याप घेतली नाही. शक्तिप्रदर्शनाचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
सदाभाऊ म्हणतात...मी भाजपवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 11:29 PM