सांगली : जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहज बोलताना, भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. येत्या दोन दिवसात सदाभाऊ खोत आणि रयत विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची बैठक घेऊन, पाठिंब्याबाबत निर्णय घेणार आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.ते म्हणाले की, जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत रयत विकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंंबा कोणाला द्यायचा, याबाबत ठरलेले नाही. आपला पाठिंंबा गुलदस्त्यातच आहे. सदाभाऊ खोत यांनी बोलता-बोलता, भाजपला पाठिंंबा असे म्हटले असेल. मात्र रयत विकास आघाडीत असणाऱ्या सर्व घटकांशी एकत्रित चर्चा करूनच निर्णय घेणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी दि. २१ मार्च रोजी होणार आहेत. पदाधिकारी निवडीलाही वेळ असल्यामुळे अद्याप निर्णय झालेला नाही. आमची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. मात्र त्यामध्ये पाठिंब्याबाबत ठोस निर्णय झाला नाही. बैठकीस सदाभाऊ खोत उपस्थित नव्हते. या रयत विकास आघाडीत विविध पक्ष व संघटनांचा सहभाग आहे. त्यामुळे पाठिंब्याबाबत निर्णय घेताना या सर्वांशी चर्चा करावी लागेल, असेही शेट्टी म्हणाले. भाजप की काँग्रेस, यापैकी काहीही ठरलेले नाही. दोन दिवसात याबाबत बैठक घेणार आहोत. उमेदवार, सर्व नेते एकत्रित बसून चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. ज्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, तो पक्ष जनतेच्या विकासाला महत्त्व देणारा असला पाहिजे. जनतेने विकासाच्या मुद्यावर आमच्या गटाला यश दिले आहे. या मतदारांची आम्ही कधीही निराशा करणार नाही, असेही शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सदाभाऊ आमचेच, तात्त्विक मतभेद : शेट्टी सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहेत. ते आमच्याबरोबरच असून केवळ तात्त्विक काही मतभेद असतील, तर आम्ही एकत्र बसून ते मिटविणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही पुन्हा एकजुटीने लढणार आहोत. कोणी कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ते होणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंधच आहे, असे मतही खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
भाजप पाठिंब्याबाबत सदाभाऊ सहज बोलले!
By admin | Published: February 27, 2017 11:39 PM