-अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच चांगले आव्हान देऊ शकतात. शिराळा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत आघाडी काँग्रेसच्या विरोधात सम्राट महाडिक निवडणूक लढविणार आहेत. इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधातील सर्वांना एकत्रित करुन विकास आघाडीची मोट बांधणार आहोत. यातून एकच उमेदवार देणार असल्याचे नानासाहेब महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.महाडिक म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाच्या भूमिकेवर राजकीय नेते तर्क—वितर्क लढवत आहेत. माझ्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत वावड्या उठत आहेत. मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. शिराळा मतदारसंघात यापूर्वी आम्ही आ. शिवाजीराव नाईक यांना वेळोवेळी मदत केली आहे. यावेळी भाजपचे तिकीट आम्हालाच हवे. शिवाजीरावांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी आम्ही आग्रह धरू.
ते म्हणाले, खा. राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीशी साटेलोटे करुन आमचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदाभाऊंना आम्ही ताकद देणार आहोत. शिराळा मतदारसंघात आमचा मुख्य विरोधक राष्ट्रवादीच असणार आहे. आम्ही शिवाजीरावांना विनंती करुन, भाजपचे तिकीट सम्राटला मिळविणार आहोत. इस्लामपूर मतदारसंघात आ. जयंत पाटील यांच्याविरोधात असलेल्या नेत्यांमध्ये आतापासूनच फूट पडू लागली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत याचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. हेच ओळखून सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे.
...म्हणून बंडखोरी केलीमहाडिक म्हणाले, दोन विधानसभा परिषद निवडणुकीत आघाडी काँग्रेसने कधीही महाडिक गटाचा विचार केलेला नाही. त्यामुळे मदन पाटील आणि विलासराव शिंदे यांच्याविरोधात मला बंडखोरी करावी लागली होती. त्यामुळेच आमचा काँग्रेस व राष्ट्रवादीवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.