अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : स्थळ : विटा नगरपरिषद, वेळ : सायंकाळी पाचची. माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची गाड्यावरच्या चहाने ‘चाय पे चर्चा’ सुरू झाली. तब्बल अर्धा तास ती चालली! येणारी विधानसभा निवडणूक बिकट आहे, एकत्रित सामना करायला पाहिजे, ते अगदी आमदार अनिल बाबर यांना थांबवायचेच, इथेपर्यंत. चहापेक्षाही गरम झालेल्या या चर्चेने खानापूर-आटपाडीतील नेत्यांच्या ऐक्याचा नारळ फुटला.त्याचे असे झाले, सोमवारी ‘लोकमत’च्या विटा कार्यालयाचा वर्धापनदिन झाला. त्यानिमित्त ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी खानापूर-आटपाडीतील नेतेमंडळी एकत्रित आली होती. आटपाडीहून अमरसिंह देशमुख आले होते. त्यांना सदाशिवराव पाटील यांनी नगरपरिषदेत चहाचे निमंत्रण दिले. जाता-जाता देशमुख तिथे गेले. नगरपरिषदेसमोरच्या चहाच्या गाड्यावर दोघांसह कार्यकर्त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. गरम चहासह राजकीय गरम चर्चा होण्याच्या शक्यतेने पाटील समर्थक लगेचच जमा होऊ लागले. नंतर नगरपरिषदेच्या कार्यालयात सगळी मंडळी गेली. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पुन्हा सगळ्यांना चहा-बिस्किटे दिली. समर्थकांची गर्दी एवढी वाढली की, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांची खुर्ची तेवढी रिकामी होती. वैभव पाटील, सदाशिवराव पाटील जवळ-जवळ बसले. थोडा वेळ शांतता पसरली. चहा-बिस्किटे संपली. तरीही शांतताच...अमरसिंह देशमुख म्हणाले, ‘मग काय? सगळे ठीक आहे ना?’ त्यावर एकटा म्हणाला, ‘विधानसभा निवडणुकीत तुम्ही एक व्हा. त्याशिवाय जमणार नाही. विट्याचे पाटील आणि आटपाडीच्या देशमुख घराण्याचे संबंध फार जुने आहेत’.थेट विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरू झाली. त्यावर देशमुख म्हणाले, ‘काय करायचे, हे एकदा ठरवावे लागेल. मग त्यानुसार पुढे काही करता येईल’.मध्येच एकजण, ‘आता एकवेळ सदाभाऊंना आमदार करूया. पुढच्यावेळी आम्ही वैभवदादांना थांबायला सांगू’, असे म्हणाला.त्यावर देशमुख म्हणाले, ‘आपल्याला आमदार व्हायचं, का कुणाला (आ. अनिल बाबर) थांबवायचं हे एकदा ठरवावं लागेल. आमच्या लोकांची आता थांबण्याची मानसिकता नाही. त्यामुळे जुळेल, पण तुम्हाला थोडे मागे-पुढे सरकावं लागेल. थांबावं लागेल’.पाटील म्हणाले, ‘सर्वेक्षण करू, थांबायचं असेल तर थांबू. बघूया. एकत्रित बसल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय काही होत नसते.’ शेवटी एकाने दोन्हीही नेत्यांना, ‘परिस्थिती बिकट आहे. एकत्रित तोंड दिले तरच निभाव लागेल’, असा सल्ला दिला. यावेळी अॅड. बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.उमेदवार कोण? हाच कळीचा मुद्दाआ. अनिल बाबर यांचे सर्व राजकीय विरोधक येत्या विधानसभा निवडणुकीत एकत्र येत आहेत. या बैठकीत गोपीचंद पडळकर उपस्थित नव्हते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीतील पाटील, देशमुख, पडळकर यांची एकूण मते एक लाख चाळीस हजार असल्याचा अनेकदा उल्लेख झाला. सगळे एकत्र आलो तर वातावरण निर्माण होऊन त्याहून जास्त मते मिळतील, यावर सर्वांचे एकमत झाले. मात्र अमरसिंह देशमुख म्हणाले, ‘मलाच पाहिजे, असे प्रत्येकाने म्हटले नाही, तरच हे जुळेल!’देशमुखांचा राजकीय बॉम्ब!गेल्या आठवड्यात अमरसिंह देशमुख यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार आटपाडीचाच होणार, असा राजकीय बॉम्ब फोडला. त्यामुळे खानापूर-आटपाडीतील राजकीय वातावरणात धमाका झाला आहे. आता आटपाडी तालुक्यातील अनेक गटाचे नेते आणि पदाधिकारी एकत्र येऊन या निर्णयाला पाठिंबा देऊ लागले आहेत. देशमुख यांनी आटपाडीकरांच्या दुखण्याला तोंड फोडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
सदाशिवराव पाटील-अमरसिंह देशमुख यांची ‘चाय पे चर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:06 AM