मिरज : पुणे - मिरजरेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणांतर्गत नांद्रे ते सांगली स्थानकांदरम्यान १२.६२ किलोमीटर दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी सोमवारी नांद्रे ते सांगली रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाची पाहणी करुन वाहतूक सुरू करण्यास संमती दिली. या दुहेरी मार्गावरून आता रेल्वेगाड्या धावणार आहेत.रेल्वेमार्गाच्या सुरक्षा पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन. पी. सिंह, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेचे सर्व नियम पाळून विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने आता या रेल्वे मार्गावरील दोन्ही मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरु होणार असल्याने रेल्वेगाड्या जलदगतीने धावणार आहेत. दुहेरी रेल्वेमार्गामुळे आता क्राॅसिंगसाठी गाड्यांना थांबावे लागणार नाही. दुहेरी रेल्वे वाहतुकीसाठी नांद्रे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.सांगली स्थानकात नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम व यंत्रसामुग्रीची कार्यक्षमता टिकवण्यासाठी रिले रूममध्ये वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली आहे. माल गाड्यांचे लोडिंग, अनलोडिंग व शटिंग सहजपणे होण्यासाठी सांगली यार्डात मालगाड्यांसाठी स्वतंत्रपणे दोन रेल्वे लाईन देण्यात येणार आहेत.सांगली स्थानकात नवीन स्थानक इमारत बांधण्यात आली असून माधवनगर स्थानकाची नवीन इमारत व प्लॅटफॉर्म बांधण्यात आले आहेत. पुणे - मिरज विभागातील २८० किमी रेल्वेमार्गापैकी आतापर्यंत १६४ किमी दुहेरीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नांद्रे-सांगली दुहेरी रेल्वे मार्गाची सुरक्षा आयुक्तांनी केली पाहणी, वाहतूक सुरू करण्यास दिली संमती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:51 AM