सांगली: नूतन बुध्दिबळ मंडळाच्या ५२ व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर फिडे मानांकन खुल्या महिला बुध्दिबळ स्पर्धेत तेलंगणाची फिडेमास्टर सहजश्री चालोटीने सात गुणांची आघाडी घेत अंतिम विजेतेपद पटकावले. सांगलीतील बापट बाल विद्यामंदिरमध्ये ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेच्या अंतिम म्हणजेच आठव्या फेरीत तेलंगणाची सहजश्री चालोटी व महाराष्ट्राची अव्वल खेळाडू रिया मराठे यांच्यातील डावाची सुरुवात घोड्याच्या चालीने झाली. सहजश्रीने रचलेल्या चालींना प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या रियाला ३७ व्या चालीला पराभव स्वीकारावा लागला. सहजश्रीने ७ गुणांसह सतरा हजाराचे रोख पारितोषिक व चंद्राबाई आरवाडे फिरती रौप्य ढाल पटकाविली. महाराष्ट्राची विश्वा शहा व गायत्री परदेशी यांच्यातील डावात विश्वाने ६० व्या चालीला गायत्रीचा पराभव करून सात गुणांसह रोख बारा हजाराचे पारितोषिक पटकावले. महाराष्ट्राची श्रुती भोसले व वृषाली देवधर यांच्यातील डावात वृषालीने श्रुतीचा ५२ व्या चालीला पराभव करून साडेसहा गुणांसह रोख आठ हजाराचे पारितोषिक पटकावले.
गोव्याची सूरी नाईक व महाराष्ट्राची धनश्री राठी यांच्यातील डावात धनश्रीने सूरीचा पराभव करून साडेसहा गुणांसह चौथे स्थान पटकाविले. गोव्याची गुंजल चोपडेकर व महाराष्ट्राची सानी देशपांडे यांच्यातील डावात दोघींनी डाव बरोबरीत सोडविला. अनुष्का पाटीलने गायत्री रजपूतचा पराभव करून सहा गुणांसह पाचवे स्थान पटकाविले. रिध्दी उपासेने श्रावणीचा पराभव करून सातवे स्थान पटकाविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापालिकेच्या उपायुक्त मौसमी चौगुले-बर्डे, चिंतामणी लिमये, स्मिता केळकर यांच्याहस्ते झाले. पंच म्हणून दीपक वायचळ यांनी काम पाहिले.स्पर्धेचा अंतिम निकाल असा : सहजश्री चालोटी (प्रथम : तेलंगणा), विश्वा शहा (द्वितीय : महाराष्ट्र), वृषाली देवधर (तृतीय : महाराष्ट्र), धनश्री राठी (चौथी : महाराष्ट्र), गुंजल चोपडेकर (पाचवी : गोवा), गायत्री रजपूत (सहावी : महाराष्ट्र), रिध्दी उपासे (सातवी : महाराष्ट्र), रिया मराठे (आठवी : महाराष्ट्र), अस्मिता रॉय (नववी : गोवा), मृण्मयी गोठमारे ( दहावी : महाराष्ट्र).* सर्वात ज्येष्ठ खेळाडू : अनिलाबेन शहा (गुजरात)* उत्कृष्ट बिगरमानांकित खेळाडू : जिया महात, देवांशी सोळंकी, पल्लवी यादव* उत्कृष्ट सांगली खेळाडू : जंगम राजप्रिया, श्रध्दा कदम, सृष्टी सपकाळ, प्रगती पाटील* उत्कृष्ट १९ वर्षांखालील खेळाडू : पूर्वा सप्रे, अर्चिता तोरस्कर, ऋचा लिमये* उत्कृष्ट १६ वर्षाखालील खेळाडू : मानसी ठाणेकर, श्रुती उपाध्ये, प्रिती हराळे* उत्कृष्ट १४ वर्षाखालील खेळाडू : समृध्दी कुलकर्णी, चारूता शेटे, ईनास शेख* उत्कृष्ट १२ वर्षाखालील खेळाडू : ऋचा डाकरे, दाक्षयानी चव्हाण, स्वराली काटे* उत्कृष्ट १० वर्षाखालील खेळाडू : क्रिया परमार, स्वराली हातवळणे, नक्षी वासनवाला* उत्कृष्ट ८ वर्षाखालील खेळाडू : निहीरा कौल, संस्कृती सुतार, हिंदवी यादव