शिरटे : साहेब, झेरॉक्सला रुपाया द्या, नाही तर सायकल राहू द्या...ह्ण असे तिने म्हणताच सर्वजण अवाक् झाले. क्षणाचाही विलंब न करता सभापती सचिन हुलवान यांनी जवळचे पाच रुपये दिले. पैसे मिळताच मुलीच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. काही मिनिटातच घडलेल्या या प्रकाराने उपस्थित सर्वजण दारिद्र्य, पैसा आणि शिक्षण या चर्चेत मश्गूल झाले. त्या मुलीला मोफत मिळणाऱ्या सायकलपेक्षा रुपयाची किंमतच जादा वाटत होती, हे मात्र नक्की!
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यालयात वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई-सुखकर प्रवास योजनेंतर्गत सायकलच्या मंजूर लाभार्थी विद्यार्थिनींचे अर्ज भरून घेण्याची सोय केली होती. सभापती व काही पालक मुख्याध्यापिका सौ. डी. डी. पाटील, शिक्षक अनिल पाटील, प्रताप पाटील यांच्याशी चर्चा करीत मुख्याध्यापक कार्यालयात बसले होते. एवढ्यात सहावीत शिकणारी एक मुलगी धावत कार्यालयाकडे आली आणि सभापतींना उद्देशून म्हणाली, ह्यसाहेब, माझ्याकडे झेरॉक्स काढण्यासाठी पैसे नाहीत. रुपाया द्या, नाही तर सायकल राहू दे.ह्ण ती अर्जासाठी लागणाºया कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी लागणारे पैसे मागत होती.
मुलीच्या त्या भाबड्या व निरागस चेहºयाकडे पाहत सभापतींनी क्षणाचाही विलंब न लावता खिशातील पाच रुपये काढले व त्या मुलीला दिले. पैसे घेताना त्या मुलीच्या चेहºयावर उमटलेले हास्य उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांनी टिपले.
महागड्या शिक्षण व्यवस्थेत सहावीतील विद्यार्थिनीकडे स्वत:जवळ एक रुपयाही असू नये, ही गंभीर बाब उपस्थितांच्या लक्षात आली. आपण पैसे कोणाकडे मागतोय, हेही न समजणाºया त्या निरागस मुलीला सद्य:परिस्थितीत सायकलच्या किमतीपेक्षा रुपायाची किंमत जादा वाटत होती!