कडेगाव येथील थोर संत सय्यद पीर साहेबहुसेन पिरजादे यांचा उरुसास प्रारंभ झाला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत यावर्षीचा उरूस सोहळा पारंपरिक धार्मिक विधीने साधेपणाने साजरा होणार आहे. दरम्यान गुरुवार दि. ७ रोजी सायंकाळी संदल, गलेफ व मिलाद शरीफ हे धार्मिक कार्यक्रम पार पडले. आज शुक्रवारी मुख्य उरूस सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे.
कडेगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्य घडवण्यात सुफी संत साहेबहुसेन यांचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कडेगाव मोहरममधील अनेक काव्यरचना त्यांनी केल्या आहेत. त्यांचे शिष्य महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील चिक्कोडी, कुडची, बेळगाव भागात मोठ्या प्रमाणात विखुरले आहेत.
प्रतिवर्षी संत साहेब हुसेन यांचा उरूस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. परंतु यावेळीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उरूस सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे.