सांगली : आरग (ता. मिरज) येथील बारावे पारिवारिक मराठी साहित्य संमेलन ३१ डिसेंबर २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधित होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे आहेत. तसेच येथील कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, तर परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून प्रा. वैजनाथ महाजन यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तुकाराम गायकवाड, कार्याध्यक्ष डॉ. अनिल कोरबू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, आरग येथील संत ज्ञानेश्वर साहित्य शैक्षणिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत यांच्यावतीने पारिवारिक साहित्य संमेलन आयोजित केले आहे. ३१ डिसेंबर २०१४ व १ जानेवारी २०१५ असे दोन दिवस साहित्य संमेलन होत आहे. या कालावधित कविसंमेलन, तसेच परिसंवादाचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रा. डॉ. सदानंद मोरे प्रथमच ग्रामीण भागातील साहित्य संमेलनास येत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकात मराठी साहित्याची गुढी उभी करणारे प्रा. वैजनाथ महाजन यांच्या प्रेरणेने हे संमेलन पुनरुज्जीवित झाले आहे. प्रा. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत असून, प्रा. विष्णू वासमकर, प्रा. भीमराव पाटील, डॉ. अनिल मडके, प्रा. संजय ठिगळे सहभागी होणार आहेत. ‘शिक्षण आणि समाज’ हा परिसंवादाचा विषय आहे. (प्रतिनिधी)
आरगमध्ये ३१ रोजी साहित्य संमेलन
By admin | Published: December 16, 2014 10:36 PM