लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : सैनिक टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी संजय सुरेश पाटील यांनी ५० गुंठे क्षेत्रात ‘ को-८६०३२’ उसाचे १४५ टन विक्रमी उत्पादन घेतले.
संजय पाटील यांनी शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस पीक स्पर्धेत भाग घेतला हाेता. लागणीपासून कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच वेळोवेळी कारखान्यावर आयोजित विविध चर्चासत्रांत सहभाग घेतला.
पाटील मागील दहा ते पंधरा वर्षांपासून विविध भाजीपाला पिके घेत आहेत जमिनीची सुपिकता टिकवून विक्रमी ऊस उत्पादन घेण्यासाठी जूनमध्ये ६ फूट सरीवर १.५ फुटावर उसाची नर्सरी लावली. उसासाठी वेळोवेळी विश्वास लिंबोळी पेंड, विश्वास मासळी खतातून रासायनिक खत चांगले मुरवून दिले. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार खत उपलब्ध झाले. त्यामुळे जास्त पाऊस असूनही विक्रमी उत्पादन शक्य झाले.
पाटील म्हणाले, ‘उसाच्या विविध वाढीच्या अवस्थेत तणनियंत्रण तसेच बाळभरणी करून घेतली. अपेक्षित ऊससंख्या झाल्यानंतर उसाची पक्की भरणी करून घेतली. ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन केले. तसेच खतांचे काही डोस ठिबकमधून दिले. नियोजन केल्याने ५० गुंठ्यांत १४५ टन विक्रमी उत्पादन मिळाले. यासाठी पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका अग्रोचे तंत्र अधिकारी बिभीषण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : २६ आष्टा ३ (पीडीएफ फाईल आहे)
ओळ : सैनिक टाकळी येथील शेतकरी संजय पाटील यांचा विक्रमी ऊस उत्पादनाबद्दल अशोका ॲग्रोचे सतीश पाटील, तंत्रअधिकारी बिभीषण पाटील यांनी सत्कार केला.