सांगली : कुपवाडमधील महापालिका मालकीच्या साठ गुंठे जागेवर सुसज्ज हॉस्पिटल व्हावे अशी मागणी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. मंत्री पाटील यांनी हाॉस्पीटलचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांना केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते आणि काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, कुपवाडसाठी स्वतंत्र हॉस्पिटल असावे या मागणीवरून सध्या वाद सुरू आहे. वारणालीतील प्रस्तावित मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कुपवाडच्या नागरिकांसाठी लांब होत असल्याने गावठाणमध्येच महापालिकेच्या हॉस्पिटल व्हावे अशी मागणी आहे. कुपवाड -कवलापूर रोडवर अवधूत कॉलनीजवळ महापालिकेची स्वतःची ६० गुंठे जागा आहे. या जागेत हॉस्पिटल होऊ शकते. कुपवाड शहर एमआयडीसी व लगतच्या परिसरातील गरीब, कामगार, मजूरांना या हॉस्पिटलचा लाभ होईल.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे भेटून तशी मागणी केली आहे. जयंत पाटील यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव देण्याची सूचना केली आहे. निवेदनावर प्रभाग समिती सभापती रईसा रंगरेज, पद्मश्री पाटील, विष्णू माने, मनगू सरगर, सविता मोहिते, वहिदा नाईकवडी, संतोष पाटील, मदिना बारूदवाले, रोहिणी पाटील या नगरसेवकांच्या स्वाक्ष-या आहेत.
सात कोटी अपेक्षित
या हॉस्पिटलसाठी सात कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आगे. हा निधी शासनाकडून देण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. याठिकाणी किमान ५० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारले जाईल, असे मोहिते म्हणाले.