बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या मालकीच्या खुल्या भूखंडाची विक्री व शासकीय जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी राज्यमंत्री केसरकर यांना मंगळवारी याबाबतचे निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा झाल्यानंतर संस्थानिकांच्या काही इमारती व खुल्या जागा शासनाने ताब्यात घेतल्या. त्यानंतर बुधगावात गावठाण हद्दीतील खुल्या जागांवर पटवर्धन सरकारांच्यावतीने तत्कालीन वटमुखत्यारांनी प्लॉट पाडले. तेथील खुल्या जागा (ओपन पीस) कब्जेपट्टीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्या. ग्रामपंचायतीने या खुल्या जागा ताब्यात घेऊन नोंदी करून नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या.या खुल्या जागांच्या नोंदी नगरभूमापन कार्यालयाकडे झाल्या नसल्याचा गैरफायदा घेऊन पटवर्धन सरकारांच्या सध्याच्या वारसांनी खुल्या जागांची विक्री केली आहे. हे भूखंड ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याचे माहीत असूनही ग्रामसेवक बसगोंडा पाटील यांनी या व्यवहारात संबंधितांना मदत केली आहे. त्यामुळे या जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर तसेच ग्रामसेवकावर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन राज्यमंत्री केसरकर यांना सादर केल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. (वार्ताहर)
बुधगावात भूखंड विक्री; शासनाचे चौकशीचे आदेश
By admin | Published: October 09, 2015 10:52 PM