गजानन पाटील : दरीबडची , अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्राहकांचे अज्ञान यामुळे जत तालुक्यातील गावोगावच्या आठवडा बाजारात निकृष्ट दर्जाच्या, अप्रमाणित खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. उघड्यावर तळून, भाजून, जुनाट, घाणेरड्या वेष्टनात पॅकिंग करून खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. पापडी, शेव, भजी, जिलेबी, वडे, पापडीची उघड्यावर विक्री होते. हे चित्र ग्रामीण भागातील आठवडा बाजारात दिसते. पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य प्रमाणित नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामीण भागातील आठवडा बाजार हे देवाण-घेवाणीचे व खरेदी-विक्रीचे प्रमुख ठिकाण आहे. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. अनेक गावांचा बाजार वेगवेगळ्या दिवशी भरतो. आठवडा बाजारामध्ये उघड्यावर तयार करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. वडा, कांदाभजी, शेव, पापडी तळण्यासाठी वापरलेले तेल, तसेच पीठ, मसाल्याचे पदार्थ, तिखट आदी साहित्य कोणत्या दर्जाचे आहे, याची माहिती सर्वसामान्य ग्राहकाला नसते. तळण्यासाठी तेल डबल फिल्टर केलेले, आयएसओ प्रमाणित कंपनीचे वापरले जात नाही. भेसळयुक्त कमी दर्जाच्या सूर्यफूल तेलाचा वापर केला जातो. परिणामी असे तळलेले पदार्थ खाऊन घसा व पोटाचे त्रास सुरू होतात. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. असे तेलकट पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांना पोटदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, आम्लपित्त, हगवण यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव जाणवतो. तसेच जिलेबी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगामुळे कॅन्सर होण्याचा धोका जास्त संभावतो.बाजारात वडा, कांदाभजी, शेव, जिलेबी, पापडी हे खाद्यपदार्थ उघड्यावर तळले जातात. पदार्थ तयार करताना धूळ, कचरा, माती पडतेच. त्याची उघड्यावरच साठवणूक केली जाते. त्यावर माशा बसतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. वास्तविक गोरगरीब, शेतमजूर लोकच या वस्तूंचे ग्राहक असतात. तसेच ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये पन्नास पैशाला मिळणारा बांबू हा खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. मक्यापासून तयार केलेला हा पदार्थ सर्वच दुकानात मिळतो. त्यावर उत्पादक कंपनीचे नाव असते. परंतु आठवडा बाजारात मळकट वेस्टनात पॅकिंग केलेले आणि कोणत्याही उत्पादक कंपनीचे नाव अथवा इतर माहिती नसणारे हे बांबू सर्रास बेकायदा विकले जात आहेत. परराज्यातून येऊन स्थायिक झालेले लोक पापडी, बटर, पाव, बांबू आदी खाद्यपदार्थ तयार करतात. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग करून त्याची प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग करून त्यांची विक्री करतात. काही उत्पादक वाळूवर पापड भाजून विक्री करतात. बांबूची पोती भरून बाजारात विक्री होते. एक पाकीट दहा रुपयांना विकले जाते. वास्तविक खाद्यपदार्थांना अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता असणे गरजेचे आहे. पण बाजारात कोणताही खाद्यपदार्थ लेबलशिवाय सहज आणि अतिशय कमी दरात उपलब्ध होतो.
जतमध्ये निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री
By admin | Published: July 14, 2014 12:20 AM