सांगली : मिरज एसटी आगारात नाथजलाची विक्री जादा दराने केल्याबद्दल ठेकेदार नईम शफीअहमद मोमीन यांना दंड ठोठावण्यात आला. प्रभारी आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात प्रवाशाकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.मिरज आगारात नाथजल या पाण्याच्या बाटलीच्या विक्रीचा परवाना मोमीन यांच्याकडे आहे. उपहारगृहातही नाथजलाची विक्री केली जाते. एक लिटर पाण्याच्या बाटलीची विक्री १५ रुपयांना करावी असे आदेश एसटीने दिले आहेत. पण विक्रेत्यांकडून सूचनेचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २ जून रोजी एका प्रवाशाला १५ रुपयांच्या बाटलीची किंमत २० रुपये सांगितली. यासंदर्भात आगार प्रशासनाकडे तक्रार दाखल झाली होती. चौकशीअंती मोमीन यांना १००० रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यावर १८० रुपयांचा जीएसटीही अतिरिक्त स्वरुपात वसूल करण्यात आला.तक्रार करण्याचे आवाहनदरम्यान, प्रवाशांना स्वस्तात पाणी मिळावे यासाठी महामंडळाने नाथजलाची सवलतीच्या दरात विक्री सुरु केली आहे. तरीही काही ठिकाणी पाण्याची बाटली जादा दराने विकली जात असल्याचे आढळले आहे. अशी फसवणूक होत असल्याचे प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन एसटीने केले आहे.
सांगलीतील मिरज एसटी आगारात नाथजलाची जादा दराने विक्री, परवानाधारकास दंड
By संतोष भिसे | Published: June 20, 2023 1:05 PM