तासगाव : तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी दिनकरआबा पाटील यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द पणाला लावली. त्यांचे रक्ताचे वारसदार म्हणून मिरवणारे खासदार संजय पाटील कारखाना घशात घालण्याचा प्रयत्न करून दिनकरआबांच्या विचारांचा वारसा पायदळी तुडवत आहेत, अशी टीकाआमदार सुमनताई पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठकीत केली.सुमनताई पाटील म्हणाल्या, कारखान्यावर पहिला आणि शेवटचा हक्क हा सभासदांचाच आहे. कारखान्याची विक्री होऊ देणार नाही. दिनकरआबांचे पुत्र अविनाश पाटील यांनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा, यासाठी लढा उभा करावा. संपूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.पाटील म्हणाल्या, हा कारखाना उभा करताना तत्कालीन राजकीय नेतृत्वाने दिनकरआबांची कोंडी केली होती. स्वत:चे राजकीय भविष्य पणाला लावून आबांनी कारखाना उभा केला. त्याचे राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागले होते; मात्र अखेरच्या क्षणापर्यंत तासगाव कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा, हीच त्यांची इच्छा होती.कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला आमचा विरोधच आहे. सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही. अविनाश पाटील यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. गरज पडल्यास सभासदांसह रस्त्यावरील आंदोलन उभारण्याचीही आमची तयारी आहे.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरदादा पाटील, तासगाव तालुकाध्यक्ष डी. के. पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन माने, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.राज्य बॅँकेचा कुटिल डावराज्य बॅँकेने यापूर्वीही एकदा कारखाना विकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर विक्री व्यवहार रद्द केला असल्याचे प्रतिज्ञापत्र बॅँकेने उच्च न्यायालयात सादर केले आहे. या सरकारने पुन्हा एकदा कारखान्याच्या विक्रीचा घाट घातला आहे. कारखाना खासदार संजय पाटील यांच्या घशात घालण्याचा कुटिल डाव राज्य बॅँक खेळत आहे.
तासगाव कारखान्याची विक्री होऊ देणार नाही: सुमनताई पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:03 PM