मिरज : मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असून, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर अमली पदार्थ विक्रीची केंद्रे बनली आहेत. अमली पदार्थांच्या व्यसनींकडून प्रवाशांच्या लूटमारीचे प्रकार सुरू आहेत.पोलिसांनी पकडलेल्या गांजा तस्कराने दिलेल्या कबुलीमुळे, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गांजाची आयात सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. गांजा, चरस यासारख्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.रेल्वे जंक्शन, वैद्यकीय नगरी, संगीत परंपरा यासाठी ख्याती असलेल्या मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. शहरात विविध ठिकाणी गांजाच्या अड्ड्यांवर अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्या कर्नाटकातून गांजा, चरस यासारख्या अमली पदार्थांची आयात करून त्यांची शहरात विक्री करीत आहेत. रेल्वे स्थानक, शहरी बस स्थानक, उत्तमनगर, कृष्णाघाट रोड, शास्त्री चौक, ख्वाजा वसाहत, स्टेशन रोड, दर्गा परिसरात गांजा विक्रीचे व व्यसनींचे अड्डे आहेत.अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यसनींकडून रेल्वे स्थानक, बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकारही सुरू आहेत. तस्करांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने गांजाची आयात व विक्री सुरूच आहे. गांजाच्या १० ग्रॅमच्या पुड्या विक्री करण्यात येतात. रेल्वे स्थानक, ख्वाजा वसाहत परिसरात ५० ते १०० रुपयास गांजा विक्री सुरू आहे.कळी गांजा, लाल गांजा, हिरवा गांजा अशा वेगवेगळ्या दर्जाच्या गांजाच्या पुड्या सहज उपलब्ध होतात. गांजापासून तयार होणारा चरस ७० हजार रूपये प्रति किलो आहे. पोलिसांच्या गांजा तस्करांवरील कारवाईमुळे गांजा विक्रीला पायबंद बसला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांची तस्करी पुन्हा सुरू झाली आहे.गांजावर कारवाईसाठी मोठ्याप्रमाणात गांजा सापडणे आवश्यक आहे. मात्र काही ग्रॅमच्या छोट्या पुड्या विक्री करणाऱ्या तस्करांवर कारवाई करणे पोलिसांना अवघड होत असल्याने, तस्करांचे फावले आहे.
अमली पदार्थांची विक्री मिरज शहरामध्ये जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 3:43 PM
मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असून, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर अमली पदार्थ विक्रीची केंद्रे बनली आहेत. अमली पदार्थांच्या व्यसनींकडून प्रवाशांच्या लूटमारीचे प्रकार सुरू आहेत.
ठळक मुद्देअमली पदार्थांची विक्री मिरज शहरामध्ये जोमातव्यसनींकडून प्रवाशांच्या लूटमारीचे प्रकार