जत : साळमळगेवाडी (ता. जत) येथील दूध व्यावसायिक अजित बाबासाहेब खांडेकर (२१) याच्या खुनाचा उलगडा करण्यात जत पाेलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सिध्दाप्पा लक्ष्मण गडदे (२२, रा. साळमळगेवाडी) व रमेश सिद्राम खोत (२२, रा. डफळापूर, ता. जत) या दोघांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यांनी पूर्ववैमनस्यातून अजितचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्यांना जत न्यायालयाने २९ जानेवारीअखेर पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.
संशयित सिध्दाप्पा गडदे व रमेश खाेत हे मावसभाऊ आहेत. अजित खांडेकर हा त्यांचा चुलत मेव्हणा आहे. अजित व सिध्दाप्पा यांच्यात अडीच महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून व दूध बिलावरून वाद झाला होता. यावेळी अजित याने सिध्दाप्पा याला बेदम मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी व समझोता करण्यासाठी सिध्दाप्पा व रमेश गुरुवारी सायंकाळी अजित याच्याकडे आले होते. यावेळी त्यांचे काहीच ऐकून न घेता अजितने पुन्हा सिध्दाप्पा याच्या कानफटात मारली. यावेळी रागाच्या भरात दाेघांनी धारदार हत्याराने गळा चिरून व हात ताेडून अजितचा निर्घृणपणे खून केला.
याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा जत पोलिसांत त्याचा भाऊ राजू खांडेकर यांनी तक्रार दिली हाेती. अजितच्या माेबाईलवर आलेल्या फाेनची माहिती घेत पाेलिसांनी तपासाला गती दिली हाेती. अजित याचा खून होण्यापूर्वी कोणाकोणाचे फोन आले होते किंवा त्यांनी कोणाला फोन केले? याची माहिती घेत असताना सिध्दाप्पा व रमेश यांची नावे पुढे आली. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
या खून प्रकरणाच्या पाठीमागे आणखी काही वेगळे कारण आहे काय? यामध्ये आणखी काेणी सहभागी आहे का? याचा शाेध पाेलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम जाधव करीत आहेत.