सांगली : हित संकेत भुरट या साडेचार वर्षाच्या बालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याच्या वडिलांचे प्राण वाचले. विजेचा धक्का बसलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी या बालकाने दाखविलेल्या शौर्याचे कौतुक उशिरा का होईना, पण होत आहे. गुरुवारी महापालिकेनेही या बालकाचा सन्मान करीत त्याच्या शौर्याला सलाम केला.
ही घटना दिवाळीच्या सुमारास घडली होती. पण वडिलांवरील उपचार व या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय अद्याप सावरले नसल्याने, त्याची फारशी वाच्यता झाली नाही. हित भुरटच्या वॉर्डातील नगरसेविका भारती दिगडे, प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर यांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी त्याचा महापालिकेतर्फे सन्मान झाला. गुरुवारी महापौर संगीता खोत, गटनेते युवराज बावडेकर यांच्या उपस्थितीत हित व त्याच्या आईचा सत्कार केला.
गावभागातील ढवळे तालीमजवळील जय अपार्टमेंटमध्ये भुरट कुटुंब राहते. दिवाळीच्या सुमारास घरात लक्ष्मीपूजनाची धावपळ सुरु असताना, वडील संकेत भुरट हे टेरेसवर विजेच्या माळा दुरुस्त करीत होते. यावेळी विजेच्या धक्क्यामुळे संकेत हे पाच फूट लांबवर फेकले गेले. पत्नी संजीवनी या पूजेचे सामान आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. घरात मुलगा हित व अडीच वर्षाची मुलगी ओवी हे दोघेच होते. या दोघा मुलांना नेमके काय घडले हेच कळले नाही. वडिलांचे हात-पाय लटपटत होते. वडिलांच्या ओठांवर लक्ष जाताच, त्यांना काय म्हणायचे आहे हे हितच्या लक्षात आले. वडील टेरेसवर... विजेचे बटण स्वयंपाकघरात... अशी अवस्था... या वयातही प्रसंगावधान राखून हित पायºयांवरुन पळत स्वयंपाकघरात गेला. खुर्चीची शोधाशोध केली. पण खुर्ची मिळाली नाही. तोपर्यंत त्याला वीस लिटर पाण्याचा कॅन आढळून आला. त्या कॅनवर चढून त्याने विजेचे बटण दाबून वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे वडिलांचे प्राण वाचले.अजूनही उपचारहित याने विद्युत पुरवठा बंद केला तरी त्याचे वडील बेशुध्द पडले होते. विजेच्या धक्क्यातून अजूनही ते सावरलेले नाहीत. त्यांच्यावर अजूनही उपचार सुरुच आहेत. गावभागातील नागरिकांत हितच्या शौर्याची चर्चा होती. पण त्याचे पालक अद्याप या धक्क्यातून सावरलेले नसल्याने त्याचे कौतुक झाले नव्हते. मात्र आता माहापालिकेने त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे.सांगली येथ महापौर संगीता खोत यांच्याहस्ते हित भुरट याचा सत्कार झाला. यावेळी युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर आदी उपस्थित होते.