सांगली : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी त्यांना जिजाऊ ब्रिगेड व मराठा संस्थेतर्फे स्वतंत्र कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडतर्फे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जिजाऊ दशरात्र महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. मराठा समाज संस्थेतर्फे महिला विभागप्रमुख ज्योती चव्हाण व ज्येष्ठ संचालक बाळासाहेब सावंत यांच्याहस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. ज्योती चव्हाण यांनी राजामाता जिजाऊंच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सरचिटणीस सुधीर सावंत, खजिनदार ए. डी. पाटील, माजी अध्यक्ष रघुनाथराव पाटील, तानाजीराव मोरे, अॅड. उत्तमराव निकम, डॉ. मोहन पाटील, अॅड. विलास हिरुगडे-पवार, महिला विभागातील स्मिता पवार, सीमा पाटील, प्रतिभा निकम आदी उपस्थित होते.जिजाऊ ब्रिगेडच्या जिजाऊ दशरात्र महोत्सवाची गुरुवारी दहाव्यादिवशी सांगता करण्यात आली. आ. सुमनताई पाटील प्रमुख पाहुण्या, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील उपस्थित होत्या. पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष हेमलता देसाई यांनी स्वागत केले. सचिव विद्युलता मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. आपल्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चतुराई, संघटन आणि पराक्रम अशा विविध गुणांचे बाळकडू दिले. दोन वर्षापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या राजमाता जिजाऊंच्या स्मारकाच्या अडीचशे रुपये कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा केला जाईल. जयश्रीताई पाटील यांनी नवीन वर्षाचा संकल्प करताना आपल्या मनातील भावना व्यक्त करा; तरच आपण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिजाऊ सावित्री दशरात्र महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत रेखा दामुगडे यांनी प्रथम, संजोत माने यांनी द्वितीय, तर विद्युलता मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.यावेळी शुभांगी देशमुख, वर्षा राऊत, रचना राऊत, सुप्रिया घार्गे, संजीवनी जाधव, सुजाता भगत, मंगला जवळेकर, विद्या मोरे, सविता माने, सविता निकम, विद्या भोसले, शीतल मोरे आदी उपस्थित होत्या. रूपाली राऊत व लता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सांगलीत जिजाऊंना अभिवादन
By admin | Published: January 12, 2017 11:59 PM