सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी वीर शिवा काशीद यांना पुण्यतिथीनिमित्त बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने वृक्षारोपणासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाभिक महामंडळाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत जिल्हाभर दहा हजार वृक्ष लागवडीच्या उपक्रमास बुधवारपासून सुरूवात करण्यात आली. शिवरायांचे सहकारी आणि स्वराज्याचे रक्षण करताना काशीद यांनी पन्हाळगडावर बलिदान दिले होते. दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सलून दुकाने बंद ठेवून त्यांना अभिवादन करण्यात येते. बुधवारी पुण्यतिथीनिमित्त कोकरूड, कवठेमहांकाळ, आटपाडी, रामानंदनगर आणि आष्टा आदी ठिकाणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीचा सामजिक उपक्रम राबवित जिल्ह्यात १० हजाराहून अधिक वृक्ष लागवड करण्याचा मानस यावेळी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी व्यक्त केला. याबरोबरच आमणापूर (ता. पलूस), मणेराजुरी (ता. तासगाव) आदी ठिकाणीही पन्हाळगडावरून ज्योत आणून ज्योतीचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यात चार हजारावर असलेल्या सलून दुकानदारांना वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे वाटप कार्यक्रमास बुधवारपासून सुरूवात झाली. विद्यार्थी दत्तक योजनेनुसार ८० गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले असून, यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. याबरोबरच जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, प्रताप यादव, संजय गायकवाड, नीतेश यादव, बाळासाहेब जाधव, अशोक सपकाळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वीर शिवा काशीद यांना जिल्ह्यात अभिवादन
By admin | Published: July 14, 2016 12:16 AM