कडेगाव : कॉँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाचे गुरुवारी कडेगाव तालुक्यात गावोगावी दर्शन घेण्यात आले. फुलांनी सजवलेल्या रथातून अस्थिकलश नेत असताना चौकाचौकात व रस्त्याच्या दुतर्फा उभा राहिलेल्या ग्रामस्थांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी कदम यांच्या आठवणींनी तालुक्यातील समाजमन गहिवरले.
कडेगाव तालुक्यातील तडसर, नेर्ली, कोतवडे, आपशिंगे, खांबळे, शिवाजीनगर, रेणुशेवाडी, विहापूर, करांडेवाडी, बोंबाळेवाडी, रायगाव, वांग रेठरे, शाळगाव, येडे उपाळे, बेलवडे, निमसोड आदी गावांतील ग्रामस्थांनी दिवंगत आमदार माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. तालुक्यातील विविध गावांतून अस्थिकलश नेताना नागरिक तसेच महिलांची दर्शनासाठी गर्दी होत होती. ‘साहेब परत या, साहेब अमर रहे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.दिवंगत नेते, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश अपशिंगे गावात आणल्यानंतर दर्शनासाठी लोकांची व महिलांची रीघ लागली होती. गावाचे भले करणाऱ्या नेत्याच्या स्मृती जागवून त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी अस्थिकलश गावात येताच दु:खाच्या सावटाखाली असलेल्या महिलांचा आक्रोश पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.ग्रामस्थांची दर्शनासाठी रीघआमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सतत सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवल्यानेच, लोकांनी त्यांना हृदयात जागा देऊन त्यांच्यावर प्रेम केले. डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी अक्षरश: ग्रामस्थांची रीघ लागली होती. यावेळी महिलांसह सर्वसामान्य नागरिकांचे डोळे पाणावले होते.आणि सगळे कर्ज माफ केले : सूर्यवंशीचार वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या आजाराने पतीचे निधन झाले. त्यानंतर काही कालावधित घराची जबाबदारी सांभाळणाºया एकुलत्या एका मुलाचेही निधन झाले. सून आणि दोन नातवंडे असा माझा परिवार खचून गेला. आमच्या डोक्यावर भारती बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज होते. या कर्जात काही तरी सवलत द्या, म्हणून आम्ही डॉ. पतंगराव कदम साहेबांची भेट घेतली. माझी व्यथा त्यांनी ऐकली आणि आमच्या दिलदार मनाच्या या देवमाणसाने आमचे संपूर्ण कर्ज माफ केले, असे अपशिंगे येथील सुरेखा महादेव सूर्यवंशी यांनी सांगितले.