तासगाव : सांबराच्या शिंगांची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील आनंद शशिकांत जाधव (वय १९) हा सांबराच्या अडीच लाख रुपये किमतीच्या पाच शिंगांची विक्री करण्यासाठी येत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीत या तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या आसद (ता. कडेगाव) येथील विजय हणमंत पाटोळे आणि सागर संजय सकटे या दोघांना अटक करण्यात आली. तिघांवरही जंगली प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.जंगली सांबरांची हत्या करून, त्यांच्या शिंगांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक पिंगळे यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्या माहितीनुसार पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलिस निरीक्षक पिसाळ यांच्या पथकाने पाळत ठेवली. तासगाव-सांगली रस्त्यावर कवठेएकंद येथे बसस्थानकालगत सांबराच्या शिंगांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून बुधवारी कवठेएकंद येथील आनंद शशिकांत जाधव एका पोत्यात पाच शिंगे घेऊन विक्री करण्यासाठी उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने तत्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, आसद येथील दोघांकडून ही शिंगे मिळाली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आसद येथील विजय हणमंत पाटोळे आणि सागर संजय सकटे या दोघांना अटक करण्यात आली. तिघांवरही जंगली प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून, त्यांना तासगाव पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपअधीक्षक पिंगळे, पोलिस निरीक्षक मिलींद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक पिसाळ यांनी ही कारवाई केली. तस्करीचे मोठे रॅकेट? सांबराच्या शिंगांच्या तस्करीचे रॅकेट तासगाव पोलिसांनी उजेडात आणले आहे. यामध्ये आसद येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटवरून सागरेश्वर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात प्राण्यांची हत्या आणि तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होत असून, यापेक्षाही मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तासगावात सांबराच्या शिंंगांची तस्करी
By admin | Published: June 30, 2016 12:11 AM