मुंबई - आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर राजकीय नेते असल्याचं पाहायला मिळालं. शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी दुर्गामाता दौड समारोप कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमप्रसंगी बोलताना त्यांनी, खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक असल्याची टीका केली. त्यांच्या या टिकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सांगलीतील दुर्गा दौड समारोप कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले की, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक आहेत. तर सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार असल्याचे भिडे यांनी म्हटले. तसेस, सर्वधर्म हा विचार इतिहासाला धरून नसल्याचेही त्यांनी म्हटले. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून संभाजी भिडे आपले काम करतात. हिंदू धर्मासाठी ते काम करतात.
राजकीय नेते लोकशाहीला लागलेला कलंक आहेत, ते आमचे खासदार काय ? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय ? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात, भाडोत्री, असे म्हणत संभाजी भिडे यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे, आता भिडेंच्या विधानावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.