Sambhaji Bhide: छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करण्यात येत होती. हिंदवी स्वराज्याची लढाई इस्लामीकरणाच्या विरोधात झाली आणि छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर आता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते, असं विधान केलं आहे. काहीजण आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा आरोपही संभाजी भिडे यांनी केला आहे.
सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना संभाजी भिडे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी पत्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं म्हटलं जातंय असं सांगितले. त्यावर संभाजी भिडे यांनी हो, सर्वधर्मीय नव्हते असं सांगितले. "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते. काही लोकांनी हे चिकटवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु धर्माच्या रक्षणासाठीच होते. इतिहासाचा अभ्यास असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करुन घेण्याची हाव असलेले सगळे भाडोत्री आहेत. त्यांच्याकडून हा गलबला निर्माण झाला आहे," असं संभाजी भिडे म्हणाले.
"शहाजी राजे हे स्वतः मला हिंदवी राज्य स्थापन करायचे आहे असं बोलले आहेत. याचे पुस्तकात पुरावे आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. पण सगळ्या समाजातील लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्यासाठी कसा होईल ते बघतात," असंही संभाजी भिडे म्हणाले.
"संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे ,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे," असं म्हणत संभाजी भिडे यांनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिले.