सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक दूध संकलन केंद्रातील बेकायदेशीर वजनकाटे बंद करण्याच्या या मागणीसाठी मंगळवारी संभाजी ब्रिगेडने वैधमापन कार्यालयात तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन संताप व्यक्त केला. बेकायदेशीर वजनकाटे बंद करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचा पाठपुरावा सुरू होता. जिल्हाअध्यक्ष सुयोग औंधकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केले. 'सांगली जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी दूध विक्री प्राथमिक दूध संकलन केंद्रात (दूध डेअरीमध्ये) दुधाची विक्री करतात. हे दूध खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरले जातात. या वजन काट्यांवर ५० व १०० मिलीच्या पटीत दूध मापन केले जाते. बहुतांशी वजनकाटे १०० मिलीच्या पटीत दूध मापन करुन दूधाची खरेदी करतात. यामध्ये शंभर मिलीच्या आतील दूध मापले जात नाही. सरासरी दिवसाला १०० मिली दूध बिनमापी डेअरीमधे ओतावे लागत आहे. हे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या बुडीत खात्यावर जमा होते. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रत्येक वेळी किमान ५ रुपयांचे नुकसान होते, असे औंधकर यांनी सांगितले. बेकायदेशीर वजनकाटे बंद करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने वारंवार वैधमापन कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मोजमापासाठी प्रमाणित मापाने दूध खरेदी करण्याचा आदेश या विभागाने लागू केला होता. पण दीड महिना होत आला तरी या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच संबंधितांवर कारवाईही केलेली नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या संतप्त कार्यकर्त्यांनी वैधमापन कार्यालयात तोडफोड केली. येत्या 15 दिवसात कारवाई केली नाही, तर पुन्हा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला.
वैधमापन कार्यालयाची संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 2:58 PM