इस्लामपूर : येथील बाजार समिती आवारातील सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडून दहा लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाºया संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (वय ४०, रा. कासेगाव, ता. वाळवा) यास रंगेहात पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली.
औंधकरच्या या कृत्यामध्ये त्याचा साथीदार व माहिती अधिकारी कार्यकर्ता कृष्णा विश्वनाथ जंगम (रा. वाळवा) याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे माहिती अधिकार कायद्याच्या मुखवट्याआडून चालणारी खंडणीखोरी चव्हाट्यावर आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत सहायक निबंधक अमोल डफळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जानेवारी २०१७ मध्ये वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली. तत्कालीन भूसंपादन अधिकारी तुषार ठोंबरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच सहायक निबंधक अमोल डफळे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी होते. यादरम्यान १० जानेवारी २०१७ रोजी औंधकरचा साथीदार संशयित कृष्णा जंगम याने उमेदवारी अर्जाची प्रसिद्धी नोटीस फलकावर का केली नाही? आपण आपल्या अधिकारपदाचा गैरवापर करीत आहात, असा अर्ज डफळे यांच्याकडे सादर केला होता. यासंदर्भात २३ जानेवारी २०१७ रोजी राज्य सहकार निवडणूक आयुक्त यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता.
आयुक्तांनी पत्राची चौकशी करून यात तथ्य नसल्याचा लेखी अभिप्राय जंगम यांना कळविला होता. ही बाब औंधकरला खटकल्याने त्याने संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या ‘लेटर पॅड’वर आयुक्तांना पत्र पाठवून डफळे यांच्यावर कारवाई का केली नाही? अशी विचारणा केली. तसेच २६ डिसेंबर २०१८ रोजी आयुक्तांना अर्वाच्च शब्द वापरले होते. कासेगाव येथे एका कार्यक्रमात अमोल डफळे यांच्या भेटीवेळी औंधकरने पैशाची मागणी केली. हा दबाव वाढविण्यासाठी १९ जानेवारी २०१९ रोजी औैंधकरने पुन्हा आयुक्तांना पत्र पाठविले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी चौकशी केली. खंडणीची रक्कम शुक्रवारी देण्याचे ठरले होते. तत्पूर्वी पिंगळे यांच्या पथकाने निबंधक कार्यालय परिसरात सापळा लावला. औंधकरने खंडणीची रक्कम घेतल्याचा सिग्नल मिळताच त्याला पकडले. औंधकरचा साथीदार कृष्णा जंगम यालाही रात्री वाळवा येथून उशिरा अटक करण्यात आली आहे.चिठ्ठीद्वारे खंडणीची मागणीऔंधकर आणि जंगम या जोडीच्या ‘ब्लॅकमेलिंग’ला वैतागलेल्या डफळे यांनी २८ जानेवारी २०१९ रोजी औंधकर यास कार्यालयात बोलावून घेतले. ‘तुम्ही ज्या तक्रारी करीत आहात, त्यात तथ्य नाही’, असे सांगितले. मात्र तरीही औंधकरने हे प्रकरण मागे घेण्यासाठी पैशाची मागणी केली. सहायक निबंधक कार्यालयातील कक्ष अधिकारी काळेबाग यांच्याकडे औंधकरने स्वत: लिहून दिलेल्या चिठ्ठीत रावळ, ठोंबरे, चौधरी व डफळे या प्रत्येकांनी अडीच लाख रुपये द्यावेत, असा मजकूर होता.