सांगली : प्रदीर्घ काळ सांगलीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रावर प्रभाव टाकणारे दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांचे नाव मारुती चौक ते शास्त्री चौक या रस्त्याला द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद फडके यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मारुती चौकातील कार्यालयातून त्यांनी त्यांची आयुष्याची अनेक वर्षे सांगलीच्या सेवेत घालविली. चारवेळा ते सांगलीचे आमदार होते. याशिवाय राजकीय, सामाजिक, तसेच क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान सांगलीकर कधीही विसरू शकत नाहीत. सांगलीचे नाव राज्यात व कुस्तीच्या माध्यमातून देशात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा आदर करून त्यांचे रस्त्याला नाव देणे उचित ठरेल.
सांगलीतील मारुती चौक ते शास्त्री चौक या रस्त्याचे पै. संभाजीराव पवार (आप्पा) असे नामकरण करावे. त्यांच्या कार्याचा सन्मान यानिमित्ताने सांगलीकर जनतेने, महापालिकेने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नामकरणासाठी सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रांतील लोकांनीही एकत्र यावे, असे आवाहन फडके यांनी केले आहे.