सांगली : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे बुधवारी एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आमदार अनिल बाबर यांना चक्क मास्क काढायला लावून कोरोना नियमांना ठेंगा दर्शविला. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात संभाजीराव भिडे यांच्या या कृतीची चर्चा रंगली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरपीआयने केली आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका रासायनिक खताच्या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना तोंडावरील मास्क काढायला लावला. आणि कोरोना होत नाही मास्क काढा असे सांगितले. यावेळी बाबर यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार मास्क काढून टाकला आणि फीत कापली.
याबाबतचे चित्रीकरण सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकाराबाबत ऊलट-सुलट चर्चा रंगली आहे. भिडे यांनी स्वतः मास्क न घालता आमदारांना मास्क काढण्याची सूचना दिली म्हणून त्यांच्यावर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.
चौगुलेंवरही दाखल झाला होता गुन्हा
एकीकडे शिवप्रतिष्ठानमधून बाहेर पडलेले व वेगळी संघटना स्थापन केलेले नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेतला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेही कोरोना नियम मोडल्याप्रकरणी कारवाईच्या 'रडार'वर आहेत.