ऐतवडे बुद्रुक : घरगुती व शेती पंपाचे वीजबिल माफ न करता महावितरणच्यावतीने वीजबिल भरण्यासाठी जबरदस्तीने वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. असे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. तरी वीज कनेक्शन तोडणाऱ्यांना जशास तसे उत्तर म्हणून सर्व शेतकरी बांधवांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऐतवडे बुद्रुक सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष शहाजी गायकवाड व परिसरातील शेतकरी यांनी निवेदनाद्वारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी सर्व शेतकरी व घरगुती वीज धारकांच्यावतीने वीजबिल माफ करावे, यासाठी आंदोलन केले होते. त्याअनुषंगाने शासनाने वीज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी जबरदस्तीने घरगुती व शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. तरी या जबरदस्तीला जशास तसे आंदोलन करून उत्तर दिले जाईल. तरी शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऐतवडे बुद्रुक सोसायटी नंबर १ चे माजी अध्यक्ष शहाजी गायकवाड व शेतकाऱ्यांनी दिला आहे.