जत : खासदार संजय पाटील यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त आमदार विलासराव जगताप समर्थक व विरोधक कार्यकर्त्यांच्या जत शहरात दोन वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यापैकी एका बैठकीत आमदार जगताप यांचे नाव न घेता कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे भाजपमधील वाद ऐन लोकसभा निवडणूक प्रचारात चव्हाट्यावर आले आहेत.
आरळी नर्सिंग कॉलेज येथील सभागृहात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांच्या समर्थकांची बैठक झाली. या बैठकीसाठी माजी आमदार मधुकर कांबळे, अॅड. एम. के. पुजारी, अॅड. नाना गडदे , अॅड. अण्णासाहेब जेऊर, सोमनिंग बोरामणी, संजय तेली, सलीम गवंडी, दशरथ चव्हाण, लिंबाजी माळी, शिवाजीराव ताड, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, शिवसेनेचे दिनकर पतंगे, अंकुश हुवाळे , तम्मा कुलाळ, बंटी दुधाळ, शिवाजी पडोळकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार विलासराव जगताप यांचे नाव न घेता कार्यकर्त्यांनी टीका केली.
प्रामाणिक व भाजपच्या सच्चा कार्यकर्त्यांची ही बैठक आहे. कार्यकर्त्याला किंमत असलेले हे व्यासपीठ आहे. ठेकेदारी पध्दतीने व हुकूमशाही कारभार येथे चालत नाही. लोकशाही मार्गाने आमचा कारभार चालतो. स्वाभिमान असलेले कार्यकर्ते या बैठकीसाठी आले आहेत. बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांना केंद्रस्थानी मानून या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पक्षाचा मालक म्हणून आदेश देणारे व किंगमेकर आलेले नाहीत, असा आरोपही करण्यात आला.भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकत्रित बसून जत तालुक्यातील पक्षांतर्गत वाद मिटवू, असे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यामुळे आता हा वाद संपुष्टात आला आहे.
निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर हे वाद संपवावे लागतील. चुका दुरुस्त करून राजकारण करावे लागते. तालुक्यात दोन-दोन चुली मांडून चालणार नाहीत. त्यामुळे आपलेच नुकसान होईल.खासदार संजय पाटील म्हणाले की, पक्षांतर्गत वाद हे पक्ष वाढविण्याचे लक्षण नाही. एकत्र बसून वाद मिटवून एकत्रित काम करण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. या वादामुळे तालुक्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सत्ता हस्तगत करण्यासाठी काम करावे.
जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात झालेल्या बैठकीस आमदार जगताप, खासदार पाटील, जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यासोबत आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, रिपब्लिकन पक्षाचे विवेक कांबळे, संजय कांबळे, शेखर इनामदार, दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, शिवसेनेचे संजय विभुते, बजरंग पाटील, प्रकाश जमदाडे, सरदार पाटील, स्नेहलता जाधव, आप्पासाहेब नामद, सुशिला तावशी, आर. के. पाटील उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले, तालुक्यातील पक्षांतर्गत हेवेदावे, गटबाजी संपणार आहे. पक्षाचा प्रमुख म्हणून येथील कार्यकर्त्यांनी आमच्याविरोधात राग व्यक्त करावा, निवडणूक प्रचारात कोणताही राग व्यक्त करू नये. गैरसमज काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पक्षाच्या उमेदवारालाच मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आ. विलासराव जगताप म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यात निवडणूक प्रचाराचे काम करणार आहे. याबाबत कोणीही शंका-कुशंका बाळगू नये. मी कोणाचाही स्वाभिमान दुखावला नाही. आतापर्यंत सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले आहे, यापुढेही करणार आहे.जगतापांच्या गुगलीवर उलट-सुलट चर्चाउमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीत जिंकल्याशिवाय प्रचारातच जिंकलो असे म्हणू नये, असा शब्दप्रयोग करून आमदार विलासराव जगताप यांनी भाषणात गुगली टाकली. यावरून कार्यकर्त्यांमध्ये लगेच राजकीय घडामोडींवर कुजबूज सुरू झाली. जगताप यांचा हा सल्ला नक्की कुणाला होता, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती.