विकास शहा
शिराळा- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ग्रामीण विकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भावी आमदार सम्राट महाडीक असा उल्लेख करताच टाळ्या वाजल्यावर टाळ्या कमी पडतात असे म्हणून भावी आमदार सम्राट महाडीकच १००% होणार म्हणजे होणारच ! असे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील भाजपच्या सभेत अण्णासाहेब डांगे यांनी हजेरी लावली होती, आणि त्यांनी आज विधान केलं आहे.
रेड ( ता.शिराळा) येथील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.
या विधानसभा मतदारसंघात शिराळा व वाळवा तालुक्यातील ४८ गावे येतात. याचबरोबर मतदार संख्याही वाळवा तालुक्यातील गावातील जास्त आहे. यामुळे निवडणुकीत वाळवा तालुक्यातील मतदारांवर मोठी भिस्त असते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना २०१४ मध्ये भाजप मधून उमेदवारी मिळाली व ते निवडून आले होते. त्यावेळी सत्यजित देशमुख यांना काँग्रेस मधून उमेदवारी मिळाली होती त्यात त्यांना ४५१३५ मते मिळाली होती.
मात्र २०१९ ला पुन्हा राजकीय गणित बदलले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख हे दोन गट एकत्र आले. आत्तापर्यंत च्या राजकीय इतिहासात जे दोन गट एकत्र येतील त्यांचा विजय नक्की असायचा. या दोघांना मिळून २०१४ च्या निवडणुकीत १ लाख ३० हजार ४९८ मते पडली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक हे नक्की विजयी होतील असे गणित मांडले गेले. मात्र शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख हे दोन गट एकत्र आले प्रत्यक्षात आमदार मानसिंगराव नाईक यांनी २५९३१ एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळविला होता.
या निवडणुकीत सम्राट महाडिक हे अपक्ष उमेदवार म्हणून लढवत होते. सम्राट यांच्या बरोबर त्यांचे बंधू राहुल महाडिक यांची मोठी साथ मिळाली होती. त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री जयंतराव पाटील , शिवाजीराव नाईक , मानसिंगराव नाईक , सत्यजित देशमुख यांची मोठी फळी कार्यरत होती. २०१४ मध्ये सत्यजित देशमुख यांना काँग्रेस ची उमेदवारी असून ४५१३५ मतदान पडले होते मात्र सम्राट महाडिक यांनी अपक्ष तसेच पुढे दिग्गज असताना सुद्धा ४६२३९ मते मिळवली होती. या त्यांच्या पडलेल्या मतांमुळे त्यांनी आपल्या गटाची ताकद दाखवली होती. तसेच नाईक- देशमुख गट एकत्र आले त्यामध्ये ५४४९६ मतांचा फटका बसला होता.
सम्राट महाडिक तसेच सत्यजित देशमुख यांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर येथील राजकारणात महाडिक कुटुंबियांची मोठी मदत असते त्यामुळे सम्राट महाडिक यांची विधानसभे साठी तर सत्यजित देशमुख यांना विधानपरिषद अथवा लोकसभेची उमेदवारी अशी चर्चा आहे.१)२०१४ विधानसभा निवडणुकीत पडलेली मते-
शिवाजीराव नाईक ( भाजपा)८५३६३(३६६८ मतांनी विजयी)मानसिंगराव नाईक(राष्ट्रवादी) ८१६९५सत्यजीत देशमुख(काँग्रेस) ४५१३५
२)२०१९ शिराळा विधानसभा मिळालेली मते
(१) मानसिंग फत्तेसिंगराव नाईक(राष्ट्रवादी) १,०१,९३३ (२५९३१ मतांनी विजयी)(२)शिवाजीराव यशवंतराव नाईक (भाजप) ७६००२(३) सम्राट नानासाहेब महाडिक अपक्ष ४६२३९