लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ८२ नव्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप गुरुवारी समितीच्या अध्यक्षा ज्योती अदाटे व सदस्य बिपीन कदम यांच्याहस्ते करण्यात आले.
मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीमार्फत काम सुरू आहे. मंजूर केलेल्या पत्रांमध्ये विधवा परित्यक्ता घटस्फोटिता, वृद्ध, निराधार, दिव्यांग आदींचा समावेश आहे. समिती स्थापन झाल्यापासून चार बैठका पार पडल्या. आजअखेर ३५० प्रकरणे तडीस लावण्यात आली. यापैकी ५० प्रकरणे अपात्र असल्याने निकाली काढण्यात आले. यावेळी ज्योती अदाटे म्हणाल्या की, जी कोणी भगिनी दुर्दैवाने विधवा होईल तिला तत्काळ रूपये २० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. फक्त ती महिला दारिद्र्यरेषेखालील यादीतील असावी. यावेळी तलाठी एम. आय. मुलाणी, एस. आय. खतिब, सचिन गुरव, प्रियांका तुपलोंडे आदी उपस्थित होते.