आटपाडी : आटपाडी येथे माण नदीतून अवैध वाळू चोरी करताना पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन येत असताना वाळूतस्करांनी धावत्या ट्रॅक्टरमधून काेतवालास ढकलून दिले. सोनारसिद्ध मंदिराच्या डाव्या बाजूला ओढ्यात हा प्रकार घडला. यामध्ये कोतवाल पोपट वाघमारे जखमी झाले. शुक्रवार, दि. २३ राेजी पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली.याप्रकरणी प्रमोद तात्यासाहेब पुजारी (रा. पुजारवाडी ता. आटपाडी) या वाळूतस्कराविराेधात दिघंचीचे मंडळ अधिकारी अरुण बन्सी साळुंखे (वय ५७, सध्या रा. विद्यानगर आटपाडी, मूळ रा. येळावी, ता. जत) यांनी आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.मंडळ अधिकारी अरुण साळुंखे, तलाठी एस. के. कुमार, कोतवाल डी. बी. मुलाणी, पोपट वाघमारे यांचे पथक अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी शुक्रवारी पहाटे आटपाडी-सोनारसिद्ध परिसरात गस्तीवर हाेते. यावेळी पिंपरी खुर्द येथील जाधव मळ्याजवळ पुलाच्या उजवीकडील बाजूस देशमुखवाडी हद्दीतील माण नदीच्या पात्रात पथकाला ट्रॅक्टर व अंदाजे एक ब्रास वाळूने भरलेली ट्रॉली दिसली.पथकाने चालकास ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. चालक प्रमोद पुजारी याच्यासोबत कोतवाल पोपट वाघमारे ट्रॅक्टरमध्ये बसले. तहसील कार्यालयाकडे जाताना सोनारसिद्ध मंदिराजवळ पुजारीने वाघमारे यांना ट्रॅक्टरमधून ढकलून देत बोंबेवाडी गावाच्या दिशेने पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत.
वाळूतस्करांनी धावत्या ट्रॅक्टरमधून कोतवालास ढकलले, आटपाडीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 1:27 PM