इस्लामपूर : दक्षिण महाराष्ट्रात पुणे-बंगलोर महामार्गावर पेठनाका म्हणजे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. याच मातीत राजारामबापू पाटील यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले वादळी नेतृत्व दिवंगत नारायणकाकांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील संदीप पाटील यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद मिळाले आहे. पाटील यांना ही संधी देऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी या घराण्याला ३२ वर्षांनी न्याय दिला आहे.१९७० ते १९८० च्या दशकात राजारामबापू पाटील यांच्या राजकीय सहवासात वाळवा तालुक्यातील पेठ (पेठनाका) येथील नारायणकाका पाटील आक्रमक राजकीय नेतृत्व होते. त्यांच्याच घराण्याला १९४० पासून राजकीय वारसा आहे. पेठ ग्रामपंचायतीवर दिवंगत तुकाराम पाटील, दिवंगत नारायणकाका व त्यानंतर संपतराव पाटील यांनी सरपंचपद भूषवले होते. नारायणकाका पाटील यांनी वाळवा पंचायतीचे सभापतीपदही भूषवले.नारायणकाकांचे पुत्र संपत पाटील यांनी गटा-तटाच्या राजकारणाला बगल देऊन १० वर्षे वाळवा पंचायत समितीचे सदस्यपद भूषवत तालुका पातळीवर नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा डाव फसला. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे आणि जयंत पाटील यांच्या अटीतटीच्या लढतीत संपत आणि प्रकाश पाटील या दोन बंधूंची भूमिका जयंत पाटील यांना खटकली असावी म्हणून राजकारणात या घराण्यातील दुसरी पिढी मागे पडली.त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात विलासराव शिंदे आणि जयंत पाटील एकत्र असले तरी इस्लामपूर मतदारसंघात वेगवेगळे गट आजही कार्यरत आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी इस्लामपूर बाजार समितीत विलासराव शिंदे गटाला सभापतीपद देऊन झुकते माप दिले आहे.
शिंदे गटाला संधीआजवर आनंदराव पाटील (साखराळे), विश्वासराव पाटील (कणेगाव), अल्लाउद्दिन चौगले (बागणी), संदीप पाटील (पेठ) या सभापती पदाच्या निवडीचा विचार करता, हे सभापती विलासराव शिंदे गटाचे असल्याचे मानले जाते. पेठची खासियत
पेठमधील रहिवासी व सातारामधील शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकारी, कायदेतज्ज्ञ व्ही. एन. पाटील, नारायणकाकांचे बंधू कायदेतज्ज्ञ वसंतराव पाटील (सांगली) यांनी सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे, या लोकांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे.